आयपीएल २०२४ च्या हंगामातील ढिसाळ कामगिरीनंतर पाच वेळचा IPL चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आगामी हंगामात मोठ्या बदलासह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. वेगवेगळ्या वृत्तामधून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार, रिटेंशनसह मुंबई इंडियन्स कॅप्टन्सीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व दिले होते. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले. कॅप्टन्सी बदलाचा हा निर्णय अनेक चाहत्यांना खटकल्याचेही पाहायला मिळाले. याच निर्णयामुळे आगामी हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार नाही, अशी चर्चाही रंगताना दिसली.
रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन्सीची ऑफर, पण..
आता सर्वोत्तम रिटेंशनसह मुंबई इंडियन्सचा संघ मागील चुका भरून काढूत पुन्हा तगडी संघ बांधणी करण्याच्या तयारीत आहे. मुख्य प्रशिक्षकमहेला जयवर्धने आणि संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा रोहितकडे संघाचे नेतृत्व देण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर रोहित शर्मानं कॅप्टन्सीला नकार देत संघाला नव्या नेतृत्वासाठी नवे नाव सुचवल्याची चर्चाही रंगू लागली आहे.
ऑल इज वेल सीनसाठी MI चा प्लान सेट
भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व द्यावे, असे रोहितनं सुचवलं आहे. त्याची ही मर्जी राखत संघ आपल्या ताफ्यातील मोठा तिढा सोडवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात मुंबई इंडियन्स किंवा या संघाशी संबंधित कुणीही अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. पण आगामी हंगामासाठी संघाने प्लान सेट केला असून रोहित शर्मासह हार्दिक पांड्या सूर्यकुमारच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातच दिसतील, अशी चर्चा आहे. मुंबई इंडियन्स किती खेळाडूंना कायम ठेवणार? आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने ५ खेळाडूंना कायम ठेवण्याचं ठरवलं आहे. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांची नावे फिक्स असल्याचे मानले जात आहे. याशिवाय तिलक वर्मा किंवा ईशान किशन या दोघांपैकी एकाच्या नावाचा समावेशही रिटेन खेळाडूंच्या यादीत असू शकतो. एका खेळाडूला RTM च्या माध्यमातून संघात कायम ठेवण्याचा विचारही मुंबई इंडियन्सचा संघ करू शकतो. रिटेन खेळाडूंची यादी समोर आल्यावरच रंगणाऱ्या चर्चेतील तथ्य बऱ्यापैकी स्पष्ट होईल. त्यावरुन पुढील गोष्टींचाही अंदाज लावणे शक्य होईल.