IPL 2025 Ricky Ponting Head Coach Of Punjab Kings : दिल्ली कॅपिटल्ससोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग प्रिती झिंटाच्या पंजाब संघाच्या ताफ्यात दिसणार आहे. पंजाब किंग्सच्या संघाने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिकी पाँटिंग याला मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रिकी पॉटिंग आणि पंजाब किंग्स फ्रँचायझी यांच्यात मोठा करार झाला असून या संघाला पहिल्यांदा चॅम्पियन करण्याची मोठी जबाबदारी तो सांभाळताना दिसेल.
पंजाबच्या संघाने ७ वर्षांत बदलले ६ कोच
संघात जॉईन झाल्यानंतर अन्य स्टाफ सदस्यांमध्ये बदल करण्याचे अधिकारही रिकी पाँटिंगला देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याने पदभार स्विकारल्यानंतर संघाच्या स्टाफ सदस्यांमध्ये आणखी काही बदल दिसू शकतात. पंजाब किंग्सचा संघ आयपीएल लिलावाआधी आणि लिलावानंतर मोठे डाव खेळण्यासाठी ओळखला जातो. पण अद्याप या संघाला चॅम्पियन होता आलेले नाही. संघाच्या प्रशिक्षकाबद्दल बोलायचे तर मागील ७ वर्षांत पंजाबच्या संघाने ६ प्रशिक्षक बदलले आहेत.
असा आहे रिकी पाँटिंगचा आयपीएलमधील प्रवास
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा २००८ च्या पहिल्या हंगामापासूनच आयपीएलशी कनेक्ट आहे. पहिल्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळताना दिसला होता. त्यानंतर तो२०१३ मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. याचवेळी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली होती. २०१४ मध्ये पाँटिंग मुबई इंडियन्सच्या त्याफ्यातील सल्लागारच्या रुपात दिसला. त्यानंतर २०१५ आणि २०१६ मध्ये त्याने याच संघाचे मुख्य प्रशिक्षक पदही सांभाळले. २०१८ मध्ये तो दिल्लीच्या कोचिंग स्टाफचा भाग झाला. २०२४ मध्येच या संघासोबतचा त्याचा करार संपुष्टात आला होता. आता तो पंजाबला मार्गदर्शन करताना दिसेल.