IPL 2025 RR vs KKR 6th Match Lokmat Player to Watch Ajinkya Rahane : आयपीएलचा उल्लेख हा इनक्रेडिबल प्रीमियर लीग असाही केला जातो. यामागचं कारण जगातील सर्वोत लोकप्रिय टी-२० लीगमधील प्रत्येक सामन्यात अविश्वसनीय काहीतरी घडताना पाहायला मिळते. त्यातालीच एक गोष्ट म्हणजे 'द ॲक्सिडेन्टल कॅप्टन'-अजिंक्य रहाणे. मुंबईकर चेहरा हा यंदाच्या हंगामात वेगवेगळ्या कारणांमुळे लक्षवेधी ठरतोय. सलामीच्या लढतीतील पराभवानंतर संघाला पहिला विजय मिळवून देण्यासाठी तो पुन्हा मैदानात शड्डू ठोकताना दिसेल. ज्या राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध तो मैदानात उतरणार आहे त्या संघाचेही त्याने आधी नेतृत्व कले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काय रणनिती आखायची हे त्याला चांगलेच ठाऊक असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यात अचानक मिळालेली नेतृत्वाच्या जबाबदारीसह कसोटीपटू या टॅगसह संयम बाजूला ठेवून आक्रमक अंदाजातील त्याचा तोरा चर्चेचा विषय ठरतोय. मूळात अजिंक्य रहाणे हा तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम शैलीत फलंदाजी करण्यासोबत नेतृत्व गुण संपन्न खेळाडू आहे. पण कॅप्टन्सी त्याला कधीच थेट मिळाली नााही. इथं जाणून घेऊयात 'द ॲक्सिडेन्टल कॅप्टन' संदर्भातील काही 'इनक्रेडिबल' गोष्टी...
आयपीएलमधील स्वस्तात मस्त कॅप्टन
अजिंक्य रहाणे हा आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी झालेल्या मेगा लिलावात पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला होता. दुसऱ्या फेरीत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं १.५० कोटी या मूळ किंमतीसह त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. एवढेच नाही तर त्याच्याकडे नेतृत्वाची धूराही दिली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पॅट कमिन्सच्या रुपात एका परदेशी चेहऱ्यासह पहिल्यांदा कॅप्टन्सी करणाऱ्या अक्षर पटेलपर्यंत अन्य सर्व कर्णधारांची आयपीएलमधील प्राइज टॅगही डबल डिजिटमध्ये दिसते. पण अजिंक्य रहाणे हा एकमेव असा कर्णधार आहे ज्याची किंमत कमी पण नेतृत्वाची हमी असे चित्र पाहायला मिळते.
अजिंक्य राहणे नाम सुनके फ्लावर समझे हो क्या...? फायर है ये
अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट वर्तुळात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या खेळाडूंपैकी आहे. मैदानात तग धरून चिवट खेळी करणं हा त्याच्या फलंदाजीचा मूळ स्वभाव. पण नव्या जमान्यात तुम्ही जुना अंदाजात मिरवू शकत नाही, हे समजून घेत तो ज्या आक्रमक अंदाजात खेळतोय ते लाजवाबच आहे. बॅटिंगमधील मूळ तंत्र जपत नवा मंत्र जपणं मुश्किल नाही, तेच तो आपल्या फलंदाजीतून दाखवून देत आहे.
नेतृत्वातील कर्तृत्वही एकदम झक्कास
अजिंक्य रहाणे हा एकही सामना न गमावणारा भारतीय कॅप्टन आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ६ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याने संघाला ४ सामन्यात विजय मिळवून दिला होता. यातील दोन सामने अनिर्णित राहिले होते. टीम इंडियातून वगळण्यात आल्यावर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उतरला. इथं वरिष्ठ खेळाडू असल्यामुळे त्याला रणजी संघाचे नेतृत्व मिळालं अन् त्याने मुंबईला रणजी स्पर्धा जिंकून देत कर्तृत्वही दाखवून दिलं. आता हाच पॅटर्न कायम ठेवत तो गत चम्पियनचा रुबाब कायम ठेवणारी कामगिरी नोंदवणार का? ते पाहण्याजोगे असेल.