IPL 2025 RR vs KKR 6th Match Lokmat Player to Watch Yashasvi Jaiswal : कार्यवाहू कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या लढतीसाठी मैदानात उतरतोय. गुवाहाटीच्या मैदानात ते गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहेत. दुखापतीतून सावरून संघाला जॉईन झालेला नियमित कर्णधार संजू सॅमसन याने पहिल्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात छाप सोडलीये. पण सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला आपला तोरा दाखवता आलेला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'यशस्वी' डाव साधणार?
जर राजस्थान रॉयल्सच्या संघाला स्पर्धेतील पहिला विजय नोंदवायचा असेल तर यशस्वी जैस्वाल याला आपल्या भात्यातील धमक दाखवून द्यावी लागेल. त्यामुळे तो गुवाहाटीच्या मैदानात तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा असतील. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघानं गत उप विजेत्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या लढतीनं सुरुवात केली होती. मोठ्या आणि आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात तो फक्त १ धावा करून बाद झाला होता. त्याचा फॉर्म हा राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढवणारा आहे.
आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतकी रेकॉर्ड
केकेआर विरुद्ध तो मोठी खेळी करून अपयश भरून काढू शकतो. यामागचं कारण या संघाविरुद्ध त्याचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड हा यशस्वी जैस्वालच्या नावे आहे. २०२३ च्या हंगामात त्याने केकेआरविरुद्धच अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या धाटणीतील खेळी तो पुन्हा दाखवून देणार का? ते पाहण्याजोगे असेल.
IPL 2025 RR vs SRH: 'तीन सामन्यांचा कर्णधार' रियान परागपुढे 'हटके' छाप पाडण्याचं आव्हान
तो सेट झाला की, मोठी डावा खेळण्याची क्षमता, पण...
यशस्वी जैस्वाल हा टीम इंडियातील नव्या सुपर हिरोंपैकी एक आहे. सेट झाला की मोठी धावसंख्या उभारण्यात तो माहिर आहे. पण गेल्या काही सामन्यात त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात चौथ्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात ८२ धावा आणि दुसऱ्या डावात ८४ धावा अशी कामगिरी केली होती. टी-२० बद्दल बोलायचं तर तो श्रीलंकेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. मागील पाच टी-२० सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध केलेली ९३ धावांची खेळी त्याच्या भात्यातील सर्वोच्च खेळी आहे. ही खेळी येऊन जमाना झालाय.
टीम इंडियातील आपलं स्थान टिकवण्याचं एक वेगळ चॅलेंज
सध्याच्या घडीला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तगडी स्पर्धा सुरु आहे. यशस्वीनं कसोटीत आपली जागा एकदम पक्की केलीये. पण वनडे आणि टी-२० मध्ये त्याला तगडी फाईट देणारी काही मंडळी आहेत. बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या इशान किशन याने हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना स्फोटक शतकी खेळीसह धमक दाखवून दिलीये. ही गोष्ट अप्रत्यक्षरित्या यशस्वी जैस्वालवर दबाव निर्माण करणारी असेल. यातून बाहेर पडायचं असेल तर मोठ्या खेळीशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसेल. तो हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 RR vs KKR 6th Match Lokmat Player to Watch Yashasvi Jaiswal Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.