आयपीएलमध्ये काल रात्री राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राजस्थानला अवघ्या २ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र या लढतीत वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने ३४ धावांची छोटेखानी पण आक्रमक खेळी करत राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. त्याच्या या खेळीचं क्रिकेटप्रेमी आणि अनेक आजीमाजी क्रिकेटपटूंकडून कौतुक केलं जात आहे. दरम्यान, आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे.
गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे. त्यात ते म्हणाले की, आज सकाळी उठताच आठवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला आयपीएलमध्ये खेळताना पाहिले. त्याने खूप जबरदस्त सुरुवात केली आहे., अशा शब्दात सुंदर पिचाई यांनी वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं.
लखनौविरुद्ध झालेल्या लढतीत यशस्वी जयस्वालसोबत सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने विस्फोटक शैलीमध्ये आपल्या आयपीएलमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनुभवी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला षटकार ठोकत आपलं खातं उघडलं. तर २० चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १७० च्या स्ट्राईक रेटसह ३४ धावांची खेळी केली.
वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावामध्ये झाला होता. डावखुरा फलंदास असलेल्या वैभव सूर्यवंशी याला यावर्षीच्या आयपीएलसाठी झालेल्या महालिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने १ कोटी १० लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले होते.
Web Title: IPL 2025, RR VS LSG: Even Google CEO was impressed by Vaibhav Suryavanshi's explosive game, Sundar Pichai praised him and said, "At the age of 14..."
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.