Join us

IPL 2025: धोनीच्या CSK ला हरवल्यानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा पराक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे

Shreyas Iyer Virat Kohli vs CSK, IPL 2025: पंजाबने चेन्नईला १८ धावांनी केलं पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:43 IST

Open in App

Shreyas Iyer Virat Kohli vs CSK, IPL 2025: चेन्नई सुपर किंग्ज संघाची हाराकिरी यंदाच्या हंगामात सुरूच आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईने सलग चार सामन्यात पराभवाचा सामना केला. पंजाब किंग्जने मंगळवारच्या सामन्यात CSK वर १८ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्य याने ४२ चेंडूत १०३ धावांची झंझावाती खेळी केली आणि संघाला २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना डेवॉन कॉनवेच्या ६९ धावांच्या बळावर चेन्नईला २० षटकात केवळ २०१ धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाचा ४ सामन्यात तिसरा विजय ठरला. या विजयासह श्रेयस अय्यरनेविराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला.

पंजाब संघाने चेन्नईवर मात केल्याने श्रेयस अय्यर हा यशस्वी कर्णधारांच्या यादीत पोहोचला. आयपीएलच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत चेन्नईच्या संघाला पराभूत करणे फारसे कुणालाही जमलेले नाही. पण श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून CSKला पाचव्यांदा पराभूत केले. विराट कोहलीने कर्णधार म्हणून चेन्नईचा चार वेळा पराभव केला होता. त्याला श्रेयसने मागे टाकले. या यादीत रोहित शर्मा १२ विजयांसह आघाडीवर आहे.

CSK ला सर्वाधिक वेळा पराभूत करणारे कर्णधार

  1. रोहित शर्मा - १२ विजय (२२ सामने)
  2. अडम गिलख्रिस्ट - ६ विजय (१० सामने)
  3. गौतम गंभीर - ६ विजय (१३ सामने)
  4. श्रेयस अय्यर - ५ विजय (१० सामने )
  5. विराट कोहली - ४ विजय (१६ सामने)

दरम्यान, पंजाबच्या डावाची सुरुवात अतिशय विचित्र झाली होती. एकीकडे प्रियांश आर्य तुफान फटकेबाजी करत असताना दुसरीकडे प्रभसिरमन सिंग (०), श्रेयस अय्यर (९), मार्कस स्टॉयनिस (४), नेहाल वढेरा (९) आणि ग्लेन मॅक्सवेल (१) हे स्वस्तात बाद झाले. प्रियांश आर्यने तुफानी फलंदाजी करत ३९ चेंडूत शतक ठोकले. त्यानंतर  शशांक सिंगने ५२ धावांची खेळी केली. तर मार्को यान्सेनने नाबाद ३४ धावा केल्या. यासह पंजाबने २० षटकात २१९ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना CSKने पॉवरप्ले मध्ये एकही विकेट गमावली नाही, पण त्यांना धावगती वाढवणेही शक्य झाले नाही. अखेर रचिन रविंद्र ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला वेगवान फलंदाजी करणे जमले नाही. धोनीने थोडी फटकेबाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सचेन्नई सुपर किंग्सविराट कोहलीश्रेयस अय्यर