Abhishek Sharma First IPL Century : हैदराबादच्या घरच्या मैदानात अभिषेक शर्मानं आयपीएलमधील पहिली सेंच्युरी झळकावली आहे. पंजाब किंग्जच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी साकारली. यंदाच्या हंगामातील हे तिसरे शतक ठरले. याआधी याच संघाकडून खेळणाऱ्या इशान किशनने या हंगामातील पहिल्या शतकाची नोंद केली होती. त्यानंतर पंजाबच्या ताफ्यातील प्रियांश आर्य याच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील दुसरे शतक पाहायला मिळाले होते. त्यात आता अभिषेक शर्माच्या शतकाची भर पडली आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील पहिली तिन्ही शतके ही डावखुऱ्या फलंदाजांच्या भात्यातून आली आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नो बॉलवर फ्री हिट मिळते, अभिषेकला सेंच्युरी मिळाली!
अभिषेक शर्माची आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात अडखळत झाली. पाच सामन्यात तो सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरताना दिसून आले. एवढेच नाही तर मागील पाच सामन्यात त्याच्या भात्यातून एकही षटकार पाहायला मिळाला नव्हता. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने सर्व कसरच भरून काढल्याचे दिसून आले. चौथ्या षटकात २८ धावांवर असताना यश ठाकूरच्या गोलंदाजीवर अभिषेक फसला होता. पण तो यश ठाकूरचा विकेट मिळवून देणारा चेंडू नो बॉल ठरला अन् अभिषेख शर्माला खेळी फुलवण्याची संधी मिळाली. फ्री हिटवर सिक्सर मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. १९ चेंडूत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. पुढच्या २१ चेंडूत त्याने तुफान फटकेबाजी कायम ठेवत ४० चेंडूत आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. नो बॉलवर फ्री हिट मिळते, पण अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली. आयपीएलमध्ये पहिले शतक साजरे केल्यावर त्याने खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...
"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"...चिठ्ठी सेलिब्रेशन!
आयपीएलमध्ये पहिली सेंच्युरी साजरी केल्यावर त्याने चिठ्ठी दाखवत शतकाचा आनंद साजरा केला. ऑरेंज आर्मीसाठी हे पहिले शतक आहे, असे लिहिलेली चिठ्ठी दाखवत त्याने हटके अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. हा फक्त ट्रेलर आहे...पिक्चर अजून बाकी आहे, असा संकेतच त्याने या सेलिब्रेशनमधून दिल्याचे दिसून येते. धावांचा पाठलाग करताना त्याच्या भात्यातून शतक आल्यामुळे ते आणखी खास ठरते.