आयपीएल आणि वादविवाद यांचं अतूट नातं आहे. त्यामुळे ग्लॅमर, पैसा यांचा तडका लागलेल्या या स्पर्धेत मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेकदा वादविवाद होत असतात. दरम्यान, स्पर्धेत काल रात्री पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या लढतीमध्ये हैदराबादच्या संघाने तुफानी खेळी करत ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्या १४१ धावांची खेळी करणारा अभिषेक शर्मा आणि आक्रमक अर्धशतक ठोकणारा ट्रॅव्हिस हेड यांनी हैदराबादच्या विजयाची पायाभरणी केली होती. दरम्यान, या सामन्यात हैदराबादची फलंदाजी सुरू असताना ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू आमनेसामने आल्याचे दिसून आले.
पंजाबने दिलेल्या २४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती त्याचदरम्यान हैदराबादच्या डावातील नवव्या षटकात हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि पंजाबचे अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. हैदराबादचे दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाजी करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला नवव्या षटकात गोलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र ट्रॅव्हिस हेड याने त्याच्यावर जोरदार हल्लाबोल करत षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकले. त्यामुळे मॅक्सवेल निराश झाला. तसेच तो ट्रॅव्हिस हेडला उद्देशून काहीतरी बोलला. षटक पूर्ण झाल्यावर ट्रॅव्हिस हेडनेही काहीतरी बोलून त्याची परतफेड केली. बघता बघता दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वाद वाढत असल्याचे पाहून पंचांनी हस्तक्षेप केला. एवढंच नाही तर पंजाबकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसनेही वादात उडी घेतली तसेच हेडसोबत वाद घालू लागला.
दरम्यान, सामन्यानंतर या शाब्दिक वादाबाबत ट्रॅव्हिस हेड म्हणाला की, जेव्हा तुम्ही कुणाला एवढ्या चांगल्या पद्धतीने ओळखता तेव्हा तुम्ही एकमेकांच्या सर्वात चांगल्या आणि सर्वात वाईट गोष्टींबाबत बोलता. त्यात काही गंभीर बाब नव्हती. थोडी गंमत जंमत झाली. बाकी ही रात्र आमच्यासाठी खास होती. आम्हाला विजयाची आवश्यकता होती. आम्ही अर्ध्या वेळातच आपलं काम पूर्ण केलं होतं. आम्ही स्वत:ला संधी दिली, सुरुवातीला थोडा संयम दाखवला. आम्ही स्वत:ला थोडा वेळ दिला आणि चांगली सुरुवात केली, असेही हेडने सांगितले.
Web Title: IPL 2025, SRH Vs PBKS: Three Australians clashed in IPL, what exactly happened on the field? Travis Head's big claim
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.