आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात इशान किशनच्या भात्यातून शानदार सेंच्युरी आली आहे. यंदाच्या हंगामातील हे पहिले शतक आहे. एवढेच नाही तर इशान किशनची आयपीएलमधील ही पहिले शतक आहे. ४५ चेंडूत त्याने शतकाला गवसणी घातली. त्याने ४७ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघानं राजस्थान रॉयल्स समोर २८७ धावांचे टार्गेट सेट केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभ्यास केला ट्रॅविस हेड, क्लासेनचा, पण इशान दाखवला आपला क्लास
इशान किशनसाठी यंदाची आयपीएल स्पर्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाबाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार खेळीनंतरही बीसीसीआयने त्याच्यासाठी दरवाजे उघडलेले नाहीत. आयपीएलमधील त्याची धमाकेदार कामगिरी पुन्हा एकदा त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुली करणारी ठरू शकते. सनरायझर्स हैदराबादचा संघ हा तगडी बॅटिंग लाइनअप असलेल्या संघापैकी एक आहे. या संघात त्याचा निभाव लागणार का? असा मोठा प्रश्न होता. पहिल्याच सामन्यात इशान किशन याने तोऱ्यात बॅटिंग करून आपली निवड एकदम परफेक्ट असल्याचे दाखवून दिले. राजस्थान रॉयल्सच्या संघानं ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा आणि हेन्री क्लासेन यांचा अभ्यास केला अन् पेपर इशान किशनचा आला असं काहीसं चित्र हैदराबादच्या मैदानात पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्सनं दिला नारळ, इशान किशननं सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पणात दाखवले तेवर
यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सच्या संघानं इशान किशनला नारळ दिला होता. गेल्या काही हंगामात तो रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळाले होते. मुंबईनं रिलीज केलेल्या या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजावर काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघानं डाव लावला. ११.२५ कोटी रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्यानेही जबरदस्त खेळीसह पैसा वसूल शो दाखवणारी खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.