Kavya Maran On Mega Auction 2025 : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल. आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल २०२५ साठी नवीन नियम केले जातील असे कळते. बीसीसीआय मेगा लिलावासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लिलावातील नियमांवरून फ्रँचायझींमध्ये एकमत झाले नाही. प्रत्येक फ्रँचायझीच्या मालकांची वेगळे मत असल्याचे दिसते. आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमासह इतर अनेक मुद्द्यांवर बीसीसीआय आणि संघ मालकांमध्ये मतमतांतरे आहेत. अशातच सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीची मालकीण काव्या मारनची नाराजी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादच्या फ्रँचायझीची मालकीण काव्या मारनने नियमांवरून नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयसोबत फ्रँचायझींच्या मालकांची बैठक पार पडली. यानंतर काव्याने आपली खदखद सांगितली. ती म्हणाली की, संघ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याआधी खूप विचार करावा लागतो. युवा खेळाडूंमध्ये गुंतवणूक करावी लागते. त्यांना तयार करण्यासाठी फार वेळ लागतो. त्यामुळे मेगा लिलाव घेणे हे योग्य नाही. कारण की लिलावात आपल्या संघातील शिलेदार दुसऱ्या संघाचा भाग बनतात. मग त्यांच्यावर प्रशिक्षक आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंनी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होत नाही, अशी माहिती क्रिकबझने दिली.
खरे तर युवा खेळाडूंमध्ये केलेली गुंतवणूक सांगताना काव्या मारनने अभिषेक शर्माचे उदाहरण दिले. अभिषेक शर्माला तयार करण्यासाठी तीन वर्षे लागली. या खेळाडूला तयार करण्यासाठी आम्ही तीन वर्षे खर्च केली. आता अभिषेक आमच्यासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याच्यासाठी फ्रँचायझीने खूप मेहनत घेतली. केवळ अभिषेक शर्माच नाही तर इतरही खेळाडूंचे उदाहरण देता येईल. अशाच प्रकारची उदाहरणं इतरही संघांमध्ये पाहायला मिळतील, असेही काव्या मारनने नमूद केले. एकूण काव्या मेगा लिलावाच्या विरोधात आहे.
Web Title: ipl 2025 Sunrisers Hyderabad franchise owner Kavya Maran expressed displeasure over Mega Auction in meeting with BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.