sanjiv goenka on rohit sharma news : मागील आयपीएल हंगामात रोहित शर्मा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. रोहितला वगळून मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचे कर्णधार बनवले. अनेकदा सामन्यादरम्यान चाहत्यांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे रोहित आगामी आयपीएल हंगामात इतर कोणत्या संघात जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. लवकरच आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी सर्वच संघांमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. नामांकित खेळाडू देखील या संघातून त्या संघात जाऊ शकतात. यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माच्याही नावाचा समावेश आहे. हिटमॅनला मुंबईची फ्रँचायझी रिलीज करेल आणि त्याला लखनौ सुपर जायंट्सची फ्रँचायझी आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.
रोहितबद्दल सुरू असलेल्या चर्चेला लखनौच्या फ्रँचायझीचे मालक संजीव गोएंका यांनी पूर्णविराम दिला. संजीव गोएंका यांना विचारण्यात आले की, लखनौने रोहित शर्मासाठी ५० कोटी रुपये बाजूला ठेवले असल्याची चर्चा आहे. याबद्दल ते म्हणाले की, मला एक सांगा की, मला किंवा तुम्हाला कोणालाच माहिती नाही की रोहित शर्मा लिलावात येणार आहे की नाही. या केवळ अफवा आहेत. मुंबई इंडियन्स रोहितला रिलीज करणार की नाही, तो लिलावात येणार की नाही... तो लिलावात जरी आला तरी तुमच्या पर्समधील ५० टक्के रक्कम एका खेळाडूसाठी वापरणार आहात, मग उरलेल्या २२ खेळाडूंना तुम्ही कसे सांभाळणार? असा प्रश्न उद्भवतो. गोएंका यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना या चर्चांना पूर्णविराम दिला.
रोहित शर्माला आपल्या संघात घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? या प्रश्नावर गोएंका यांनी सावध प्रतिक्रिया दिली. रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील. एक चांगला खेळाडू, चांगला कर्णधार आपल्या संघात असावा असे सर्वांना वाटते. हे इच्छेबद्दल नाही. आपल्याकडे काय आहे आणि काय उपलब्ध आहे. आपण त्याचे काय करू शकता हे महत्त्वाचे असते. माझी इच्छा काहीही असू शकते आणि हे सर्व फ्रँचायझींना लागू होते. पण, ते सर्वांना मिळत नाही, असे गोएंका यांनी मिश्किलपणे म्हटले.