Join us  

भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

मागील महिन्यात राहुल द्रविड आणि विक्रम राठोड राजस्थान रॉयल्सच्या संघाशी जोडले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 4:21 PM

Open in App

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाला विश्वविजेते बनवणारे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घरवापसी झाली आहे. ते इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी हंगामात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. ते २००८ मध्ये मुंबईच्या संघाच्या कोचिंग स्टाफचे सदस्य राहिले आहेत. म्हांब्रे हे मुंबईचा विद्यमान गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा आणि मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मेगा लिलावातही ते उपस्थित असतील. मुंबईच्या फ्रँचायझीने बुधवारी ही घोषणा केली. पारस या वर्षी २९ जून रोजी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.

मागील महिन्यात राहुल द्रविड आणि विक्रम राठोड राजस्थान रॉयल्सच्या संघाशी जोडले गेले. फ्रँचायझीने २० सप्टेंबर रोजी दोन्ही भारतीय प्रशिक्षकांच्या समावेशाची घोषणा केली होती. द्रविड आणि राठोड यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. म्हांब्रे यांनी भारताकडून दोन कसोटी आणि तीन वन डे सामने खेळले आहेत. त्यांची प्रथम श्रेणीतील कारकीर्द उत्कृष्ट होती, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना फारसे यश मिळाले नाही.

काही दिवसांपूर्वीमुंबई इंडियन्सच्या संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकन मार्क बाऊचरच्या जागी मुंबईने श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने ( Mahela Jayawardene ) याला संघाचा मुख्य प्रशिक्षक केले. लवकरच आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार यंदाचा लिलाव फार वेगळा असेल. 

IPL चे नवीन नियम काय आहेत?IPLच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक संघ लिलावाआधी ५ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि १ अनकॅप्ड (अद्याप आंतरराष्ट्रीय संघात न खेळलेला) खेळाडू संघात कायम ठेवू शकतात. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त १२० कोटी रुपयांची मर्यादा आहे. रिटेन केलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी पहिल्या खेळाडूला १८ कोटी, दुसऱ्या खेळाडूला १४ कोटी आणि तिसऱ्याला ११ कोटी द्यावे लागतील. पुन्हा चौथ्या खेळाडूसाठी १८ कोटी तर पाचव्या खेळाडूसाठी १४ कोटींची किंमत मोजावी लागेल. तसेच अनकॅप्ड भारतीय खेळाडूला रिटेन करण्यासाठी ४ कोटी मोजावे लागतील.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२४