virat kohli rcb captain : आयपीएल २०२५ चा हंगाम विविध कारणांनी खास असणार आहे. याची चाहूल आतापासूनच लागते आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात काही अनुभवी भारतीय खेळाडू दिसण्याची शक्यता आहे. अशातच IPL २०२५ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी संबंधित एक मोठी बातमी येत आहे. पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला आरसीबीचा संघ पुन्हा एकदा विराट कोहलीला कर्णधार बनवणार आहे. आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाला संघाची कमान परदेशी कर्णधाराऐवजी भारतीय खेळाडूकडे सोपवायची आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसने आयपीएल २०२४ मध्ये संघाचे नेतृत्व केले होते.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, आरसीबीच्या व्यवस्थापनाने विराट कोहलीशी चर्चा केली आहे. संघाच्या गरजा लक्षात घेऊन कोहली पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्यास तयार होऊ शकतो. विराट कोहलीने २०१३ ते २०२१ दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व केले आहे. आपल्या कर्णधारपदाखाली त्याने संघाला अंतिम फेरीत नेले असले तरी विजेतेपद मिळवता आलेले नाही. आरसीबीच्या सध्याच्या संघात विराट कोहली कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. खरे तर आरसीबी विराट कोहली व्यतिरिक्त मोहम्मद सिराज, यश दयाल, विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल यांना रिटेन करू शकते.
IPL 2025 साठी खेळाडूंना रिटेन करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. या तारखेपर्यंत प्रत्येक फ्रँचायझीला त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल भाष्य करायचे झाले तर, फाफ डू प्लेसिसने गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व केले होते. तो ४० वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत आरसीबी संघासाठी नवीन कर्णधाराची निवड करू शकते. माहितीनुसार, आरसीबीने शुभमन गिललाही त्यांच्या संघात सामील करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही निष्पन्न झाले नाही.