Yashasvi Jaiswal Shubman Gill Funny Video, IPL 2025 RR vs GT: आज गुजरात टायटन्स संघाचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. गुजरातच्या संघाने आतापर्यंत ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील हा संघ ६ गुणांसह टॉप ४ मध्ये आहे. दुसरीकडे राजस्थानचा संघ ४ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह सातव्या स्थानी आहे. दोन्ही संघांनी या सामन्याआधी कसून सराव केला. मैदानावर दोन्ही संघाचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून खेळतील. पण सामन्याआधी मात्र या संघातील खेळाडू मजा मस्करी करताना दिसले. भारताकडून खेळणारे दोन सलामीवीर शुबमन गिल आणि राजस्थान रॉयल्सचायशस्वी जैस्वाल यांच्यात मजेशीर संवाद रंगल्याचे दिसून आले.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला चिडवताना दिसत आहे. अर्थात, टीम इंडियाच्या या दोन सलामीवीरांमधील बाँडिंग जबरदस्त आहे, पण तरीही यांच्यातील मजेशीर प्रसंग पाहून तुम्हालाही आनंद होईल. अहमदाबादच्या मैदानावर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल भेटले. तेव्हा जैस्वाल म्हणाला की, गिल तुझे गाल लाल-लाल झालेत, सध्या गर्मी कमी आहे त्यामुळे असं झालंय. या मजा मस्करीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचेही दिसले.
दरम्यान, राजस्थानकडून आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये शुभमन गिल टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला भेटायला जातो. द्रविड अद्याप पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही, त्यामुळे गिल त्याच्याजवळ जाऊन त्याला हस्तांदोलन करतो. त्यावेळी द्रविड गिलचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल अभिनंदन करतो.
सामन्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण दिसून आले. मात्र मैदानात दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध दंड थोपटणार आहेत.