Wasim Jaffer, IPL 2025: आगामी IPLच्या लिलावाआधी काही बडे खेळाडू आपापले आताचे संघ सोडून दुसऱ्या संघात जाण्याची चर्चा रंगली आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा संघ सोडण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दिल्ली आणि रिषभ पंत यांच्यातही सारंकाही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. केएल राहुलदेखील लखनौच्या संघाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान, पंजाब किंग्ज संघाच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी मिळत आहे. पण ही बातमी खेळाडूबाबत नसून कोचबाबत आहे. पंजाब किंग्जचा संघ लवकरच वासिम जाफरला कोच म्हणून नियुक्त करू शकतो अशी चर्चा आहे.
रणजी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफर याला पंजाब किंग्ज संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवडले जाऊ शकते असे वृत्त इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार दिले जात आहे. पंजाब किंग्जने ट्रेव्हर बेलिस यांच्याशी दोन वर्षांचा हेड कोच पदाचा करार केला होता. त्यांचा हा करार संपुष्टात आला असून या दोन वर्षात पंजाबच्या संघाला प्ले-ऑफ्स फेरी गाठता आली नाही. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर असमाधानी असलेल्या पंजाब किंग्जने पुन्हा एकदा भारतीय कोचला पसंती देण्याचे ठरवले आहे असे सांगितले जात आहे.
वासिम जाफर २०१९ ते २०२१ या कालावधीत पंजाब किंग्जचा कोच होता. त्यानंतर २०२३ साली तो पंजाब किंग्जचा बॅटिंग कन्सल्टंट होता. २०२१नंतर मेगा लिलावाच्या आधी तो स्वत:हून हेड कोच पदावरून पायउतार झाला होता. तर २०२४च्या IPL आधी त्याला संघ व्यवस्थापनाने करारमुक्त केले होते.
ट्रेव्हर बेलिस यांच्या दोन वर्षांच्या हेड कोच पदाच्या कालावधीत पंजाब किंग्जचा संघ स्पर्धच्या गुणतालिकेत आठवा आणि नववा होता. आता मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर एका चांगल्या हेड कोचच्या मार्गदर्शनाखाली नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्याचे आव्हान पंजाब किंग्जच्या पुढ्यात आहे.