मुंबई : सध्याच्या घडीला देशामध्ये लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात आयपीएलही रंगणार असल्याचे म्हटले जात आहे. हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या आहेत. आज आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
निवडणूक असल्यामुळे आयपीएल भारतात खेळणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. कारण सुरक्षा यंत्रणा आयपीएलपेक्षा निवडणूकीलाच प्राधान्य देणार आहे. दुसरीकडे आयपीएलच्या तारखा बदलता येऊ शकत नाहीत. कारण एखाद्या स्पर्धेनंतर दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळताना 15 दिवसांचा किमान अवधी असणे आयसीसीच्या नियमानुसार गरजेचे आहे. त्यामुळे आयपीएलची तारीख बदलता येणे शक्य नाही.
आयपीएलची तारीख बदलता येत नसेल आणि निवडणूकही असेल, तर ही लीग भारताबाहेर खेळवण्याचाही विचार होऊ शकतो. पण देशाबाहेर स्पर्धा गेली तर बीसीसीआयला कमी आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएल भारतामध्ये खेळवण्यात जास्त रस आहे. आता बीसीसीआय आयपीएलबाबत नेमका काय निर्णय घेते हे काही तासांतच आपल्याला समजू शकेल.
चेन्नई सुपरकिंग्जवरील बंदी अयोग्य होती
आयपीएलमधील स्पॉट-फिक्संगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जवर घालण्यात आलेली बंदी ही अयोग्य होती, अशा कडक शब्दांत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी टीका केली आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबर असलेल्या काही व्यक्तींनी फिक्संग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनचे सट्टेबाजांशी असलेले संबंधही उघड झाले होते. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बंदी उठल्यावर चेन्नई सुपरकिंग्जचा संघ गेल्या हंगामात आयपीएलमध्ये खेळला होता.
श्रीनिवासन यांनी सांगितले की, " बीसीसीआयमध्ये मीदेखील काम केले आहे. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. पण काम करून आम्ही कधीही त्याची जाहिरातबाजी केली नाही किंवा कोणतेही हितसंबंध जपले नाहीत. सध्याच्या घडीला बीसीसीआयमध्ये ज्या व्यक्ती कार्यरत आहेत, त्या स्वत:चा फायदा बघत आहे. "