नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आगामी सत्राची सुरुवात इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका संपल्यानंतर १२ दिवसांनी ९ एप्रिलपासून होणार असल्याचे वृत्त आहे. ही माहिती भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) एका सूत्राने शनिवारी दिली. इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना पुणे येथे २८ मार्च रोजी खेळल्या जाईल. या लोकप्रिय टी-२० लीगचा अवधी टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बघून निश्चित करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, पुढील आठवड्यात संचालन समितीच्या बैठकीदरम्यान तारखा व स्थानांना औपचारिक मंजुरी मिळेल.’ कोविडचा प्रभाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने सध्याच्या स्थितीत आयपीएलच्या सामन्यांचे पाच शहरांत चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली व अहमदाबाद येथे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरात सामन्यांच्या आयोजनासाठी मंजुरी घ्यावी लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चेन्नई व कोलकातामध्ये सामन्यांच्या तारखा पुढील काही आठवड्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निश्चित करण्यात येतील.