मुंबई - आयपीएलच्या सर्व फ्रेंचाइजींनी संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंसह संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरलेला हार्दिक पांड्या याला गुजरात टायटन्सने आपल्या संघात कायम ठेवले आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो लवकरच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येईल. तसेच, चेन्नई सुपरकिंग्जने दिग्गज महेंद्रसिंह धोनीला कायम ठेवल्याने तो पुढील सत्रात खेळणार असल्याचेही स्पष्ट झाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
आयपीएलच्या पुढील सत्रासाठी होणाऱ्या छोट्या लिलाव प्रक्रियेपूर्वी सर्व फ्रेंचाइजींनी काही खेळाडू संघात कायम ठेवताना, काही खेळाडू मुक्त केले. याआधी हार्दिक आणि गुजरात टायटन्समध्ये बिनसल्याची चर्चा सुरू झाकी होती. यामुळे ट्रेडिंग विंडोनुसार तो मुंबई इंडियन्स संघात परतणार अशी चर्चाही सुरू झाली होती. गुजरातने रविवारी आपला संघ जाहीर करत हार्दिकलाही कायम ठेवले. त्यामुळे तूर्तास तरी तो गुजरात संघाकडे आहे. परंतु, आयपीएल सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ट्रेडिंग १२ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असून यादरम्यान हार्दिकचा कधीही मुंबई संघात प्रवेश होऊ शकतो. मुंबई संघाकडे सध्या १५.२५ कोटी रुपये शिल्लक असून ते हार्दिकसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लिलाव प्रक्रियेत मुंबईकडे केवळ २५ लाख रुपये उरतील.
चेन्नई सुपरकिंग्जने धोनीसह एकूण आठ खेळाडू कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सने मुक्त केलेल्या ११ खेळाडूंपैकी ५ विदेशी खेळाडू असून यामध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचाही समावेश आहे. सतत दुखापतग्रस्त राहिल्याने आर्चरचा अपेक्षित वापर मुंबईला करता आला नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मात्र मुंबई इंडियन्सने कायम ठेवले आहे.
माही खेलेगा!
आयपीएल फ्रेंचाइजींनी आपापल्या खेळाडूंची नावे जाहीर केल्यानंतर सर्व चाहत्यांचे लक्ष गेले ते चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे. गतविजेत्या सीएसकेने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये आघाडीवर महेंद्रसिंह धोनीचे नाव ठेवले आणि यानंतर सोशल मीडियावर धोनी चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. धोनी यापुढे आयपीएल खेळणार नाही, तो सीएसकेचा मार्गदर्शक म्हणून पुढील सत्रात सहभागी होईल, अशा चर्चा याआधी रंगल्या होत्या. मात्र, रविवारी सीएसकेने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये धोनीलाही स्थान दिल्याने त्याच्या खेळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे यंदाही आयपीएलदरम्यान सीएसकेच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये ‘पिवळी’ गर्दी दिसेल हे नक्की.
आर्चर, हेझलवूड यांच्याबाबत लक्षवेधी निर्णय : हर्षा भोगले
आयपीएल संघांनी रविवारी खेळाडूंची नावे जाहीर केल्यानंतर दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियाद्वारे जोफ्रा आर्चरसह जोश हेझलवूडबाबत घेतलेले निर्णय लक्षवेधी ठरल्याचे म्हटले. त्यांनी ट्विट केले की, ‘दोन खेळाडूंबाबत घेतलेले निर्णय उत्सुकतेचे ठरले. पहिले म्हणजे मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला मुक्त केले. त्याला एमआयने सांभाळून ठेवले. दुसरा खेळाडू म्हणजे जोश हेझलवूड. आरसीबीने त्याला मुक्त केलेला निर्णय म्हणजे तो या सत्रासाठी उलब्ध नसणार असाही होतो.’
Web Title: IPL; At present Hardik Pandya only for Gujarat, but soon he will come to Mumbai, Dhoni will also play this year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.