बंगळुरु : भारतीय उद्योगपती, देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन, बिर्ला इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड सायन्सचे चान्सलर आणि आयआयटी, दिल्लीचे चेअरमन. बिर्ला ग्रुपचे मालक कुमार मंगलम बिर्ला.
कुमार मंगलम बिर्ला यांना कोण नाही ओळखत ? पण तुम्हाला त्यांचा मुलगा आर्यमन बिर्लाबाबत माहितीये का ? नसेल माहीत तर माहीत करून घ्या कारण जर नशीबाने साथ दिली तर यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळताना दिसू शकतो. कुमार बिर्ला यांची वार्षिक कमाई 12.7 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 80 हजार 825 कोटी रूपये इतकी असून त्यांचे तीन अपत्य आहेत. अनन्या आणि अद्वैतशा या दोघी मुली आणि आर्यमन बिर्ला हा मुलगा. पण या तीघांमध्ये आर्यमनची गोष्ट विशेष आहे.
सामान्यतः व्यापारी घराण्यातील तरूण आपल्या वडिलांचा कारभार सांभाळतात. पण 20 वर्षीय आर्यमनने असं काहीही केलं नाही. साधारण 8-9 वर्षांचा असताना त्याने सर्वप्रथम क्रिकेट खेळायला सुरूवात केली. कालांतराने क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली आणि इतर सर्व खेळ सोडून तो क्रिकेटकडे वळला. मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला शिकल्याने खेळाच्या बारीक गोष्टी समजल्या आणि त्याचा स्थानिक क्रिकेट खेळताना फायदा झाला असं आर्यमन पूर्वी दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता. मुंबईत क्रिकेट खेळण्यास सुरूवात केल्यानंतर त्याने मध्य प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्या सांगण्यानुसार त्याने मध्य प्रदेशच्या रीवाकडून खेळण्याचा निर्णय घेतला अशी माहिती आहे.
तो रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. यंदाच्या आयपीएल लिलावात आर्यमनसाठी पहिल्या टप्प्यात कोणत्याही संघाने बोली लावली नाही, पण नंतरच्या टप्प्यात राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर बोली लावली. राजस्थान रॉयल्सने बोली लावत त्याला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. त्याची बेस प्राईस 20 लाख रुपये होती. पण पहिल्या टप्प्यात त्याच्यावर बोली न लावण्याचं कारणंही न समजण्यासारंखं होतं.
भलेही आर्यमान श्रीमंत घराण्यातून येत असला तरी आपल्या खेळाच्या बळावर त्याने सर्वप्रथम अंडर-19 टी-20 संघात जागा मिळवली. नंतर अष्टपैलू आर्यमानने सीके नायडू ट्रॉफीमध्ये खो-याने धावा केल्या. पाच सामन्यांच्या 9 डावांमध्ये तीन शतकांसह 602 धावा बनवल्या. या तीन शतकांमध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. याशिवाय फिरकी गोलंदाजी करताना त्याने 10 विकेट देखील घेतल्या. छत्तीसगडविरोधात 388 चेंडूंचा सामना करत त्याने केलेली द्विशतकी खेळी विशेष चर्चेत होती.