बंगळुरू - सलग दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर कोणत्याही संघमालकांनी बोली लावली नाही. एकेकाळी आपल्या स्फोटक फलंदाजीनं गोलदांजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या ख्रिस गेलला आयपीएलच्या 11 व्या सत्रात कोणीही बोली लावली नाही. त्यामुळं आता तो आपली बेस प्राइज कमी करुन पुन्हा एकदा आयपीएलमध्ये येतो का हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे मुरली विजयला चेन्नईनं खरेदी केलं. तर पार्थिव पटेलसाठी मुंबई आणि आरसीबीमध्ये चुरस लागली होती. पण शेवटी आरसीबीनं त्याला खरेदी करत दिलासा दिला. ऑफ्रिकेच्या स्नगनलाही आज खरेदीदार मिळाला नाही.
आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या एकाही संघानं गेलला दोन्ही दिवशी खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली नाही. आयपीएलच्या दहाव्या सत्रात गेलला आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यानं केवळ एकाच सामन्यांमध्ये जोरदार फटकेबाजी केली होती. खराब परफॉर्मन्समुळे त्याला काही मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही बसावं लागलं होतं. याचाच परिणाम आज झालेल्या लिलावात पाहायला मिळाला. दहाव्या आयपीएलमध्ये आरसीबीने गेलला दहा सामन्यात अंतिम 11 मध्ये संधी दिली होती. मात्र, गेलने दहा सामन्यात फक्त 200 धावा काढल्या होत्या, तो पूर्णपणे अपयशी ठरला, आयपीएलमध्ये गेलने 101 सामन्यात 3626 धावा कुटल्या आहेत. आज गेलबरोबरच इंग्लडचा कर्णधार रूटवरही कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे हे दोघे उद्या पुन्हा लिलावात उपलब्ध राहणार आहेत.
काल बोली न लागलेल्या खेळाडूंवर आज पुन्हा एकदा बोली लागली. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीललाही कोणी खरेदीदार मिळाला नाही. तर मुरली विजयला चेन्नईनं दोन कोटींमध्ये खरेदी केलं. सॅम बिल्गींज एक कोटींच्या बोलीवर चेन्नईच्या ताफ्यात.
- प्रदीप साहू 20 लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
- श्रीलंकेचा अकिला धनंजया 50 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार
- डेल स्टेनवर सलग दुसऱ्या फेरीत बोली नाही
- आदित्य तरे 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
- मयांक मार्कंडे 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
- सयान घोष 20 लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार
- बिपुल शर्मा 20 लाखांच्या बोलीत हैदराबाद संघाकडून खेळणार
- सिद्धेश लाड 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
- प्रशांत चोप्रा 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
- टीम साऊदी एक कोटींच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- मिचेल जॉन्सन दोन कोटींच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार
- पार्थिव पटेल एक कोटी 70 लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर बंगळुरुकडे
- नमन ओझा एक कोटी 40 लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडे
- सॅम बिल्गींज एक कोटींच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जकडे