मुंबईः चार चेंडूवर चार षटकार ठोकून वेस्ट इंडिजच्या टी-२० विश्वविजयाचा शिल्पकार ठरलेला तडाखेबंद फलंदाज, ऑल-राउंडर कार्लोस ब्रॅथवेट याला आयपीएल लिलावात मोठी लॉटरी लागली आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं विंडीजच्या या कर्णधाराला ५ कोटी रुपयांना खरेदी केलं. त्याची बेस प्राइस ७५ लाख रुपये होती. परंतु, या स्फोटक फलंदाजासाठी बोली लागत गेली आणि अखेर केकेआरनं बाजी मारली.
त्याचवेळी, वेस्ट इंडिजचाच आणखी एक देधडक शिलेदार शिमरॉन हेटमयारला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ४.२ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं आहे. त्याची बेस प्राइस ५० लाख रुपये होती.
या दोघांसोबत, कॅरेबियन बेटांवरचा उगवता तारा मानला जाणारा निकोलस पूरन यानंही नशीब काढलंय. किंग्स इलेव्हन पंजाबनं ४.२० कोटी रुपयांना विकत घेतलं.
अक्षर पटेल, विहारीचं भाग्य फळफळलं!
टीम इंडियाचा हिरो युवराज सिंग, आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा, इंग्लंडचा ऑल राउंडर ख्रिस वोक्स, मार्टिन गप्टील, ब्रँडन मॅकलम अशा रथी-महारथींना खरेदीदार मिळत नसताना अक्षर पटेलचं भाग्य भारीच फळफळलं. दिल्ली कॅपिटल्स संघानं त्याला ५ कोटी रुपये देऊन खरेदी केलं. हनुमा विहारीही दिल्लीच्या ताफ्यात गेला असून त्याच्या खात्यात २ कोटी रुपये जमा होणार आहेत.