मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : दोन दिवसांपूर्वी आयपीएलचा लिलाव पाहायला मिळाला. या लिलावामध्ये एकाही खेळाडूला दहा कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली नाही. पण एका खेळाडूला आयपीएलच्या लिलावामध्ये तब्बल 25 कोटी मिळाले असते. असा खुलासा भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केला आहे.
आयपीएलच्या या लिलावामध्ये नावारुपाला न आलेल्या वरुण चक्रवर्तीला तब्बल 8.40 कोटी रुपये मिळाले आणि साऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण दुसरीकडे नावारुपाला आलेल्या खेळाडूंची मात्र यावेळी बोळवण करण्यात आली. युवराज सिंगसारख्या नावाजलेल्या खेळाडूला पहिल्या फेरीत कुणीही वाली नव्हता. पण दुसऱ्या फेरीत मात्र युवराजला मूळ किंमत असलेल्या एक कोटी रक्कमेवर मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल करून घेतले.
नुकत्याच झालेल्या लिलावावर गावस्कर यांनी भाष्य केले आहे. गावस्कर म्हणाले की, " भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्यावर जर आयपीएलच्या लिलावात बोली लावली गेली असती तर त्यांच्यावर 25 कोटी रुपयांचीही बोली लागली असती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 साली विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर कपिल यांनी 175 धावांची जी खेळी साकारली होती, ती अविस्मरणीय अशीच होती."
कपिल यांनी गावस्कर यांच्या वक्तव्यावर मजेशीर मत व्यक्त केले आहे. कपिल यावेळी म्हणाले की, " जर आयपीएलच्या लिलावात मला 25 कोटी रुपये मिळाले असते तर त्यामधील 10-15 कोटी रुपये मी गावस्कर यांना दिले असते."