नवी दिल्ली, आयपीएल लिलाव 2019 : जयपूर येथे नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात वरुण चक्रवर्थी आणि जयदेव उनाडकट यांनी सर्वाधिक प्रत्येकी 8.4 कोटी किंमत घेत भाव खाल्ला. मात्र, यंदाच्या आयपीएल लिलावात एका कुटुंबाला बंपर लॉटरी लागली. एकाच कुटुंबातील दोन भावांना दोन वेगवेगळ्या संघांनी खरेदी केले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे वाटू लागले आहे.
यष्टिरक्षक प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग यांना अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाव आणि मुंबई इंडियन्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले. प्रभसिमरनला आपल्या चमूत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली आणि अखेरीस पंजाबने 4.8 कोटी रुपयांत, तर फलंदाज अनमोलप्रीतला 80 लाखांत मुंबईने आपल्या संघात घेतले. अनमोल आणि प्रभसिमरन हे सावत्र भाऊ आहेत आणि ते एकत्र कुटुंबात राहतात. अनमोलचे वडिल सतविंदर सिंह हे हँडबॉलपटू आहेत आणि त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. सतविंदर यांना क्रिकेट अजिबात आवडत नाही आणि अनमोलने क्रिकेट खेळावे अशी त्यांची इच्छा नव्हती. मात्र, अनमोल आणि प्रभसिमरन यांनी क्रिकेटचीच निवड केली.
लिलावात प्रभसिमरनचे नाव येताच कुटुंबीय आनंदी झाले. मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी पहिली बोली लावली. मात्र, पंजाबने बाजी मारली. प्रभसिमरन म्हणाला,''अनमोलला काँट्रॅक्ट मिळणार यावर विश्वास होताच, परंतु मला एवढी मोठी रक्कम मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.'' अनमोल म्हणाला,''आमचे दोघांचे नाव लिलावाता आल्यानंतर कुटुंबीय आनंदी झाले.''