मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : सिक्सर किंग युवराज सिंगची यंदाच्या लिलावासाठी मूळ किंमत एक कोटी ठेवण्यात आली होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत युवराजवर कुणीही बोली लावली नव्हती. त्यावेळी युवराज आता आयपीएलमधून बाहेर जाणार, अशी चर्चा सुरु झाली होती. पण मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सत्रात युवराजला आपल्या संघात सामील करून घेतले. या समावेशामध्ये मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरचा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे.
युवराज हा एक असा खेळाडू आहे की त्याला डिवचलं की तो पेटून उठतो. 2007 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात ही गोष्ट साऱ्यांनीच अनुभवली आहे. युवराजने खेचलेले सहा षटकार कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. 2011 साली भारताने जो विश्वचषक जिंकला त्यामध्येही युवराजचा सिंहाचा वाटा होता. विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने युवराजला गौरवण्यात आले होते.
युवराजला जेव्हा पहिल्या फेरीत कुणीही वाली मिळाला नाही तेव्हा साऱ्यांचेच डोळे विस्फारले गेले होते. दुसऱ्या फेरीत तरी युवराजला कुणी संघात घेणार का, असे चर्वितचर्वण सुरु होते. पहिल्या फेरीनंतर एक मोठा ब्रेक घेण्यात आला. लिलावाच्या ठिकाणी संघाच्या मालकिण नीता अंबानी होत्या. या ब्रेकच्यावेळी मुंबई इंडियन्सच्या लिलावातील संघाला सचिनने युवराजला संघात घेण्याबद्दल सांगितले. या महान खेळाडूचा मान ठेवत नीता अंबानी यांनी त्वरीत युवराजला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले, असे सूत्रांनी सांगितले आहे.
Web Title: IPL auction 2019: Sachin Tendulkar's masterstroke to take Yuvraj to Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.