मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : आयपीएलच्या लिलावात काही धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या. या लिलावात मुख्य आर्कषण होता तो युवराज सिंग. पण त्याला पहिल्या फेरीत कोणीही वाली मिळाला नाही आणि साऱ्यांचेच डोळे विस्फारले गेले. पण या लिलावानंतर दस्तुखुद्द युवराज सिंगने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
आयपीएलच्या या लिलावामध्ये नावारुपाला न आलेल्या वरुण चक्रवर्तीला तब्बल 8.40 कोटी रुपये मिळाले आणि साऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण दुसरीकडे नावारुपाला आलेल्या खेळाडूंची मात्र यावेळी बोळवण करण्यात आली. युवराज सिंगसारख्या नावाजलेल्या खेळाडूला पहिल्या फेरीत कुणीही वाली नव्हता. पण दुसऱ्या फेरीत मात्र युवराजला मूळ किंमत असलेल्या एक कोटी रक्कमेवर मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल करून घेतले.
गेल्या हंगामात युवराजला आयपीएलमध्ये 8 डावांमध्ये फक्त 65 धावा करता आल्या होत्या. त्याबरोबर युवराज सध्या भारतीय संघात नाही. आगामी विश्वचषकाच्या संघात युवराजला स्थान मिळणार नाही, हेदेखील आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युवराजला आयपीएलच्या लिलावात जास्त भाव मिळाला नसल्याचे म्हटले जात होते.
या लिलावानंतर युवराजने आपली प्रतिक्रीया एका वृत्तपत्राकडे व्यक्त केली आहे. लिलावातील पहिल्या फेरीत जेव्हा कुणीही बोली लावली नाही, याबद्दल युवराज म्हणाला की, " पहिल्या फेरीत जेव्हा माझ्यावर बोली लावली गेली नाही, तेव्हा मला धक्का बसला नाही. मी या गोष्टीसाठी तयार होतो. कारण आयपीएलमध्ये युवा खेळाडूंवर जास्त बोली लावली जाते, हे मला माहिती होते. त्यामुळे जर मला कोणत्याही संघाने संधी दिली नसती तर मला धक्का बसला नसता. कारण मी आता कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतात."