इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबनं तीन कोटींत इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला आपल्या ताफ्याल दाखल करून घेतले. जॉर्डननं बिग बॅश लीगमध्ये शनिवारी पैसा वसूल कामगिरी केली. पर्थ स्कॉचर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जॉर्डननं क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवली. त्यानं एक अफलातून झेल घेत सर्वांना अवाक् केले. याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या मिचेल मार्शनं प्रतिस्पर्धी मेलबर्न रेनेगॅडेस संघांच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पर्थ स्कॉचर्स संघानं 7 बाद 196 धावांचा डोंगर उभा केला. पण, सामन्याच्या दुसऱ्या डावात जॉर्डनचा झेल चर्चेचा विषय ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना शॉन मार्श आणि बीयू बेवस्टर यांनी तुफान फटकेबाजी करून तोडीसतोड उत्तर दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्न संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अॅरोन फिंच ( 28) आणि सॅम हार्पर ( 15) हे त्वरित माघारी परतले. पण, त्यानंतर शॉन मार्शनं तुफान खेळी केली. 38 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकार लगावताना त्यानं 55 धावा केल्या. त्याला बीजे वेबस्टरची तोडीसतोड साथ मिळाली. पण, फवाद अहमदनं मार्शला बाद केल्यानंतर मेलबर्न संघाचा डाव गडगडला. वेबस्टरनं 37 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 67 धावा केल्या. मेलबर्न संघाला 6 बाद 185 धावांपर्यंत मजल मारता आली आणि पर्थ स्कॉचर्स संघानं 11 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या 18व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डॅनिएल ख्रिस्टीयनचा अफलातून झेल घेत जॉर्डननं सर्वांची वाहवाह मिळवली.
पाहा व्हिडीओ...