इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. पण, युवा खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधलेल्या मुळचा उत्तर प्रदेशचा, परंतु मुंबई कर्मभूमी असलेल्या यशस्वी जैस्वालना आयपीएलचे पहिले काँट्रॅक्ट मिळाले.
याच युवा खेळाडूंत यशस्वीनं सर्वाधिक भाव खाल्ला. यशस्वीच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्या यशाला मिळत असलेल्या लखलखाटामागे मनाला हेलावून टाकणारी दुसरी बाजू आहे. तीन वर्ष यशस्वी तंबूत राहिला, पाणीपुरी विकली... क्रिकेटपटू बनण्यासाठी त्यानं जे हाल सोसले, ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण, त्याचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं. फक्त एक यशस्वी क्रिकेटपटू बनायचंय हे एकच ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला. उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. त्याच्या वडिलांचं गावाकडं एक लहानस दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मुंबई गाठली.
मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर छोटं असल्यानं सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला. त्यानं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती. त्याचे वडील मुंबईला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे. या यशस्वीला राजस्थान रॉयल्सनं 2.40 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.