IPL Auction 2021, CSK, MS Dhoni : कोरोनाच्या काळात आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी (IPL 2021 Auction) चेन्नईत उद्या खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. यासाठी प्रत्येक संघाचे मालक, प्रशिक्षक आणि व्यवस्थापनातील मंडळी चेन्नईत दाखल झाली आहेत. आयपीएलसाठी यंदा २९२ खेळांडूचा लिलाव होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यंदाच्या लिलाव प्रक्रियेच्या कार्यक्रमाला हजेरी लावेल अशी अटकळ बांधली जात होती. पण धोनीच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. कारण धोनी लिलाव प्रक्रियेला उपस्थित राहणार नसल्याचं संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Mahendra Singh Dhoni in IPL 2021 Auction)
मोठी बातमी! किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं नावात केला बदल, लोगोही बदलला
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी एक महत्वाची माहिती देखील यावेळी दिली आहे. लिलाव प्रक्रियेच्या कार्यक्रमात केवळ धोनीच नव्हे, तर यंदा संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग देखील उपस्थित राहणार नाहीत, असं सांगण्यात आलं आहे. यंदा आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव धोनीच्या होमग्राउंड अर्थात चेन्नईत होत असल्यानं आणि त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्यानं तो लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन जातीनं लक्ष देणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होती.
स्टीफन फ्लेमिंग यांची दरवर्षी असायची उपस्थिती
चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी लिलाव प्रक्रियेत थेट सहभागी होताना दिसला नसला तरी संघाचे प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंग दरवर्षी आवर्जुन उपस्थित असायचे. २००९ पासून प्रत्येक लिलाव प्रक्रियेवेळी चेन्नई सुपरकिंग्जच्या टेबलवर स्टीफन फ्लेमिंग उपस्थित राहिले आहेत. पण कोरोनाच्या क्वारंटाइन नियमांचं पालन करावं लागत असल्यानं फ्लेमिंग यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चेन्नईच्या परंपरेला यंदा ब्रेक मिळाला आहे. तसंच चेन्नईच्या संघासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. "धोनी आणि फ्लेमिंग जरी लिलाव प्रक्रियेला उपस्थित राहणार नसले तरी ते सतत संपर्कात असतील", असं संघाच्या सीईओंनी सांगितलं आहे.
IPL 2021 Auction : लिलावापूर्वीच अर्जुन तेंडुलकर दिसला 'या' संघाच्या जर्सीत; चर्चांनी वातावरण तापले
चेन्नईच्या संघानं यंदा हरभजन सिंग, केदार जाधव, पियुष जाधव यांसारख्या दिग्गज खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. यामुळे संघात आता फिरकीपटू आणि मधल्याफळीतील फलंदाजाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे या जागी आता कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. चेन्नईच्या संघातील मोकळ्या झालेल्या जागा भरण्यासाठी संघाला ६ भारतीय आणि एका विदेशी खेळाडूला ताफ्यात दाखल करुन घेता येणार आहे. चेन्नईनं याआधीच रॉबिन उथप्पा याला संघात घेतलं आहे.
Web Title: ipl auction 2021 ms dhoni and stephen fleming to miss ipl auction 2021 for chennai super kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.