मुंबई - आयपीएल २०२२ च्या लिलावामध्ये १५ देशातील ६०० हून अधिक खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या मेगाऑक्शनमध्ये दोन भावांच्या जोड्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या भावांच्या दोन जोड्यांनी मिळून ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेची कमाई केली आहे. हार्दिक पांड्याला काही दिवसांपूर्वी गुजरात टायटन्सने १५ कोटी रुपयांना करारबद्ध करून आपला कर्णधार बनवले होते. तर शनिवारी झालेल्या लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्सने वेगवान गोलंदाज दीपक चहर याला १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. तर हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या याला लखनौ सुपरजायंट्स संघाने ८.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. तर लेग स्पिनर राहुल चहर याला पंजाब किंग्स संघाने ५.२५ कोटी रुपयांना खरेदी करून संघात समाविष्ट केले. अशा प्रकारे या दोन भावांच्या जोड्यांनी मिळून ४२.५ कोटी रुपयांची कमाई केली.
या चार खेळाडूंचा विचार केल्यास तिघांचा संघ २०२२ मध्ये बदलला आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळत होते. मात्र संघाने दोघांना रिटेन केले नाही. तर राहुल चहरसुद्धा मुंबईच्या संघात होता. मात्र आता हे तिघेही तीन वेगवेगळ्या संघाकडून खेळताना दिसतील. केवळ दीपक चहर पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दिसणार आहे. मागच्या हंगामामध्येही तो धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समध्ये होता. चेन्नईने गेल्या हंगामात चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले होते. त्यामुळे संघाने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे.
आयपीएल २०२२ पासून टी-२० लीगमध्ये ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरणार आहे. संघांची संख्या वाढल्यावर बीसीसीआयकडून संघांच्या पर्समध्येही वाढ करण्यात आला आहे. त्यामुळे एका संघाला कमाल ९० कोटी रुपये खर्च करता येणार आहे. या सर्वांनी सर्व १० संघ खेळाडूंच्या खरेदीवर कमाल ९०० कोटी रुपये खर्य करू शकतात. एका टीममध्ये किमान १८ आणि कमाल २५ खेळाडू असू शकतात. एका संघ ८ परदेशी खेळाडूंना करारबद्ध करू शकतो. मात्र अंतिम संघात केवळ ४ परदेशी खेळाडू खेळू शकतात.