औरंगाबाद : भारताला अंडर १९ वर्ल्डकप जिंकून देण्यात निर्णायक योगदान देणारा ‘मराठवाडा एक्स्प्रेस’, तेजतर्रार गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर याला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जने रविवारी तब्बल दीड कोटी मोजले. लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगसाठी निवड झालेला राजवर्धन हा मराठवाड्याचा आतापर्यंतचा पाचवा खेळाडू ठरला आहे.
आज बंगलोर येथे झालेल्या बोली प्रक्रियेत राजवर्धन हंगरगेकरला आपल्या संघात घेण्यासाठी तुल्यबळ मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या संघात चुरस होती. राजवर्धन हंगरगेकर याची पदार्पणातच ३० लाख बेस प्राइज असतानाही चेन्नई सुपरकिंग्जने त्याला दीड कोटी रुपयांत आपल्या संघात खेचले. या निवडीमुळे भारताचा माजी कर्णधार व स्फोटक फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या यशातही राजवर्धनने निर्णायक योगदान दिले.