अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
लिलावाचा दुसरा दिवस गाजवला तो मुंबई इंडियन्सने. पहिल्या दिवशी त्यांच्या योजनेवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण त्यांनी काही खेळाडू आधीच आपल्या रडारवर ठेवले होते आणि त्यांना आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. जोफ्रा आर्चरची केलेले खरेदी मुंबई इंडियन्सची 'स्मार्ट' चाल ठरली. यामुळे जसप्रीत बुमराह-जोफ्रा आर्चर अशी खतरनाक वेगवान गोलंदाजांची जोडी मुंबईकडे तयार झाली आहे. ज्याप्रकारे मुंबईने पुनरागमन केले, ते पाहता त्यांचा संघ आता मजबूत भासत आहे.
एकूण लिलाव प्रक्रियेवर नजर टाकल्यास लखनौ सुपरजायंट्सने केलेली खरेदी संघाचा ताळमेळ साधणारी दिसत आहे. लखनौसाठी गौतम गंभीरची उपस्थिती निर्णायक ठरली. गंभीर स्वत: दोनवेळचा आयपीएल विजेता कर्णधार आहे. त्याला खेळाडूंची पूर्ण कल्पना आहे. टी-२० प्रकार तो चांगल्याप्रकारे समजून घेतो. त्यामुळे त्याचा अनुभव लखनौला खूप उपयोगी आला. यंदाच्या लिलावात दोन नवे संघ असल्याने खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळाला. त्यामुळेच खेळाडूंच्या खरेदी प्रक्रियेमध्ये सर्वच फ्रेंचाईजींमध्ये गोंधळही उडाला. उपलब्ध असलेल्या मर्यादित रकमेतून प्रत्येक संघाची अचूक खेळाडू निवडताना 'कसोटी' लागली.