बंगळुरु : आयपीएलच्या आगामी १५व्या पर्वासाठी शनिवारी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ३८८ कोटी १० लाख रुपये खर्च झाले. पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडूंवर बोली लागली. यामध्ये ५४ भारतीय, तर २० विदेशी खेळाडूंनी कमाई केली. मूळचा झारखंडचा मात्र आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून चमकलेला इशान किशान अपेक्षेप्रमाणे सर्वांत महागडा ठरला. मुंबई इंडियन्सने तब्बल १५ कोटी २५ लाख रुपयांची किंमत मोजून किशनला आपल्या ताफ्यात पुन्हा ठेवले.
महागड्या खेळाडूंमध्ये अव्वल पाचमध्ये भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले, तर श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदू हसरंगा सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला. त्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने १०.७५ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले.
इशान किशन झाला मालामालयुवा यष्टिरक्षक इशान किशन याने लिलावामध्ये चांगलाच भाव खाल्ला. आयपीएल लिलावाच्या इतिहासामध्ये तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा भारतीय ठरला. मुंबई इंडियन्सने किशनसाठी सर्वाधिक १५.२५ कोटी रुपयांची बोली लावली. या आधी २०१५ च्या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्सने (दिल्ली कॅपिटल्स) युवराज सिंगसाठी विक्रमी १६ कोटी रुपयांची बोली लावली होती. या विक्रम मोडण्यात मात्र किशनला अपयश आले.
चर्चा सुहाना आणि आर्यन खानची -लिलावात बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता नाइट रायडर्सचा सह-मालक शाहरूख खानची लेक सुहाना आणि मुलगा आर्यन यांनी लक्ष वेधले. केकेआरची सह-मालकीण आणि अभिनेत्री जुही चावला हिची कन्या जान्हवी हीदेखील लिलावासाठी उपस्थित होती. सुहाना कायमच विविध गोष्टींसाठी चर्चेत असते. लिलाव प्रक्रियेच्या आधी लिलावाच्या प्लॅनिंग मिटिंगलाही सुहाना खान हजर होती. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त राहिलेला आर्यन खानही यावेळी दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळेच लिलावातील खेळाडूंसोबतच शाहरूखची ही दोन मुले चर्चेचा विषय ठरली.