चेन्नई : मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा, तसेच अगदी सुरुवातीपासून स्पर्धा गाजविणारा अनुभवी खेळाडू म्हणजे सुरेश रैना. मात्र, याच सुरेश रैनाला १५ व्या पर्वाआधी झालेल्या महालिलावामध्ये कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. रैना ‘अनसोल्ड’ राहिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्ती केली.
दुसरीकडे दुखावलेल्या रैनाने कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला इन्स्ट्राग्रामवर ‘अनफॉलो’ केले. चेन्नई सुपर किंग्सकडून मागील अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या रैनाला त्याच्या जुन्या संघाने देखील विचारले नाही. चेन्नईने किमान रैनासाठी बोली लावायला हवी होती असे मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केले. अनेकांनी तर सीएसकेने रैनाला चुकीची वागणूक दिल्याचाही आरोप केलाय. मात्र, आता रैनाला चेन्नईने विकत का घेतले नाही? याचा खुलासा चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी केला. ‘रैना १२ वर्षांपासून सीएसकेसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. रैनाला विकत न घेण्याचा निर्णय आमच्यासाठी फार कठीण होता. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की संघाची रचना आणि कामगिरी त्या संघातील खेळाडूंवर अवलंबून असते. त्यात रैना फिट बसत नव्हता, असे काशी यांनी म्हटले आहे.
आयपीएलमधील सर्वांत यशस्वी डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश असणाऱ्या रैनाने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले आहेत. यात त्याने एक शतक आणि ३९ अर्थशतके ठोकली. एकूण ५ हजार ५२८ धावा त्याने केल्या. मागच्या पर्वात १२ सामन्यांत एक अर्धशतकासह १६० धावा केल्या.