IPL Auction 2023: जगातील सर्वात लोकप्रिय T-20 लीग असलेली इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) साठी आज मिनी लिलाव कोची येथे पार पडला. या लिलावात सर्व संघांमध्ये सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सनेही चांगले खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी खिसा मोकळा केला. यावेळी मुंबईने पोलार्टच्या जागी एका घातक खेळाडूला संघात घेतले आहे.
पोलार्डची जागा घेणार
किरॉन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे आणि आयपीएल 2021 च्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हार्दिक पांड्या आता गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची फलंदाजी थोडी कमकुवत झाली आहे. पण, आता लिलावात मुंबईने एका स्फोटक खेळाडूला सामील केले आहे.
दुसरा सर्वात महाग खेळाडू
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला 17.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. कॅमेरून ग्रीन अत्यंत स्फोटक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीत माहिर आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला असताना कॅमेरून ग्रीनने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना चकीत केले होते.
कॅमेरूनची कामगिरी
कॅमेरून ग्रीनने 20 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात 30 चेंडूत 61 धावा फटकावल्या, ज्यात 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात कॅमेरून ग्रीनने 1 बळीही घेतला. यानंतर 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात ग्रीनने 21 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. भारतीय खेळपट्ट्यांवर कॅमेरून ग्रीनचा धडाकेबाज फॉर्म पाहून सर्व संघांना या हंगामात त्याला आपल्या बाजूने घ्यायचे होते. परंतु मुंबई इंडियन्सने मोठी बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले.
IPL 2023 चे टॉप 3 महागडे खेळाडू
- सॅम करन (इंग्लंड) - 18.50 कोटी, पंजाब किंग्ज
- कॅमेरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया) - 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स
- बेन स्टोक्स (इंग्लंड) - 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
Web Title: IPL Auction 2023: Mumbai Indians fill Pollard-Hardiks spot, include dangerous player in team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.