IPL Auction 2024: आयपीएल २०२४ साठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडत आहे. लिलावाच्या रिंगणात एकूण ३३३ खेळाडू असून जास्तीत जास्त ७७ खेळाडूंना संधी मिळणार आहे. लिलावासाठी सर्व १० फ्रँचायझींच्या खात्यात एकूण २६२.९५ कोटी रुपये आहेत आणि या पर्समधून जास्तीत जास्त ७७ खेळाडूंवर बोली लागणार आहे.
चेन्नई आणि हैदराबादने शार्दुल ठाकूरला २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यात रस दाखवला. अखेर चेन्नईच्या फ्रँचायझीने ४ कोटी देऊन शार्दुलला आपल्या ताफ्यात घेतले.
तर न्यूझीलंडकडून विश्वचषक गाजवणारा रचिन रवींद्र ५० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने १.८ कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले.
दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीने आयपीएल लिलावाआधी एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानूसार लिलावात चेन्नईने बोली लावली देखील मात्र मुंबई इंडियन्सने देखील त्यात रस दाखवला. कोएत्जीला मुंबई इंडियन्सने ५ कोटींना विकत घेतले आहे. कोएत्जीची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस झाली. त्यानंतर यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने उडी घेतली. मुंबईने माघार घेतल्यानंतर चेन्नई आणि आरसीबी यांच्यात चुरस झाली. अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोणतीच फ्रँचायझी कसर सोडू इच्छित नव्हती. पण, पर्स खाली होत असल्याने आणि रक्कम जास्त झाल्याने चेन्नईने माघार घेतली. मग सनरायझर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरूवात केली. बंगळुरू आणि हैदराबाद यांची फ्रँचायझी कमिन्सला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रणनीती आखत होती. अखेर बंगळुरू आणि आरसीबी यांनी मोठी पर्स मोजण्याचा इरादा कायम ठेवला. लक्षणीय बाब म्हणजे सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजत कमिन्सला २०.५० कोटीत आपल्या संघात घेतले.