IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सुरू असलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क या दोन स्टार खेळाडूंनी जवळपास ४५ कोटी आपल्या खिशात घातले. सनरायझर्स हैदराबादने ऑसी कर्णधार पॅट कमिन्ससाठी २०.५० कोटी रुपये मोजले आणि तो आयपीएल इतिहासात २० कोटींच्या वर बोली लावला गेलेला पहिला खेळाडू ठरला. हा विक्रम काही तासातच सहकारी मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) मोडला... ८ वर्षानंतर आयपीएलमध्ये परतलेल्या मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये मोजले. आता त्यांच्या पर्समध्ये केवळ ६.९५ कोटीच उरले आहेत.
आयपीएल ऑक्शनपूर्वी KKR ने गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याची घरवापसी करून घेतली. मागील दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सला मार्गदर्शन करणारा गौतम आता KKRच्या डग आऊटमध्ये दिसणार आहे. गंभीरच्याच नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने दोन आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. त्यामुळे २०२४ साठी त्याच्या येण्याने संघात बदल होईल हे अपेक्षित होते. त्याने शकीब अल हसन, लिटन दास, आर्या देसाई, डेव्हिड विसे, नारायण जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, जॉन्सन चार्ल्स या खेळाडूंना रिलीज करून आपल्या पर्समधील रक्कम वाढवली.
मिचेल स्टार्कसाठी त्याने ही रक्कम वाढवल्याचे आज स्पष्ट झाले. २ कोटी मुळ किंमत असलेल्या स्टार्कसाठी मुंबई इंडियन्सने पहिली बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पॅडल उंचावले. माहेला जयवर्धने जोफ्रा आर्चरची रिप्लेसमेंट म्हणून स्टार्ककडे पाहत होता. मुंबई व दिल्ली यांच्यातल्या स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सने ९.८ कोटींची बोली लावून एन्ट्री घेतली. स्टार्ससाठीचा आकडा १० कोटींच्या पार गेल्यावर गुजरात टायटन्सनेही बोली लावली.
आता गुजरात टायटन्स व कोलकाता यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. गुजरातने १२ कोटी बोली लावून आघाडी घेतली होती. पण, कोलकातानेही माघार नाही घेतली १५.५ कोटी बोली लावून तेही टक्कर देत राहिले. गुजरातने २० कोटींची बोली लावताच कोलकाताच्या टेबलवर थोडी चर्चा झालेली पाहायला मिळाली. पण, मेंटॉर गौतम गंभीर ठाम होता आणि त्याने बोली सुरूच ठेवली. कोलकाताने २४.७५ कोटी बोली लावून स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतले.
केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, स्टार्कच्या बोलीच्या आत्ताच मला कोणीतरी सांगितले, त्यांनी एक ऐतिहासिक बोली लावली. खूप लवकर इतिहास बदलला. आयपीएल बदलले आहे आणि पगाराची कॅप बदलली आहे (हसते). प्रत्येकजण आपापल्या योजना घेऊन येतो. त्या कौशल्याच्या दृष्टीकोनातून स्टार्क हा खेळाडू होता. आम्ही काही बोलींमध्ये यशस्वी झालो नाही, त्यामुळे आमचा फायदाच झाला असं म्हणावं लागेल की आम्ही स्टार्कला आपल्या ताफ्यात घेऊ शकलो.
Web Title: IPL Auction 2024 : Mitchell Starc is back in the IPL after eight years and how! Sold to KKR for 24.75 crore, Gautam Gambhir Mastermind
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.