Join us  

रिषभ असतानाही DCने यष्टिरक्षकासाठी मोजले ७.२० कोटी! १७व्या वर्षी ठोकलेले द्विशतक 

समीर रिझवी, शुभम दुबे यांच्या पंक्तित कुमार कुशाग्रा ( Kumar Kushagra) याचे नाव जोडले गेले. दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये खेळणार असतानाही या यष्टिरक्षकासाठी मोठी रक्कम मोजली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 6:39 PM

Open in App

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार पॅट कमिन्स ( captain Pat Cummins) साठी सनरायझर्स हैदराबादने २० कोटी मोजले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच्या मिचेल स्टार्क ( Mitchell Starc ) साठी कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ लाख  मोजले. या स्टार्ससाठी मोठी रक्कम मोजली जात असताना आज अनकॅप खेळाडूही मालामाल झाले. समीर रिझवी, शुभम दुबे यांच्या पंक्तित कुमार कुशाग्रा ( Kumar Kushagra) याचे नाव जोडले गेले. दिल्ली कॅपिटल्सने रिषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये खेळणार असतानाही या यष्टिरक्षकासाठी मोठी रक्कम मोजली. 

IPL 2024 Auction मधील महागडे खेळाडू

  • मिचेल स्टार्क ( कोलकाता नाइट रायडर्स ) - २४.७५ कोटी
  • पॅट कमिन्स ( सनरायझर्स हैदराबाद ) - २०.५० कोटी
  • डॅरिल मिचेल ( चेन्नई सुपर किंग्स ) - १४ कोटी
  • हर्षल पटेल ( पंजाब किंग्स ) - ११.७५ कोटी
  • अल्झारी जोसेफ ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) - ११.५० कोटी
  • समीर रिझवी  ( चेन्नई सुपर किंग्स) - ८.४० कोटी
  • शाहरुख खान ( गुजरात टायटन्स) - ७.४० कोटी
  • रोव्हमन पॉवेल ( राजस्थान रॉयल्स) - ७.४० कोटी
  • कुमार कुशाग्र ( दिल्ली कॅपिटल्स) - ७.२० कोटी
  • ट्रॅव्हिस हेड ( सनरायझर्स हैदराबाद ) - ६.८० कोटी

 

कोण आहे कुमार कुशाग्रा?

झारखंडचा यष्टिरक्षक फलंदाज कुमार कुशाग्रा साठी अनेक संघांनी बोली लावली. पण, दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूला २० लाखांच्या मुळ किंमतीपासून ते ७.२० कोटींत खरेदी केले. चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स हेही कुशाग्रासाठी उत्सुक होते. कुशाग्राने या वर्षाच्या सुरुवातीला देवधर ट्रॉफीमध्ये १०९.१३ च्या स्ट्राइक रेटने २२७ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर होता.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये कुशाग्राने ३७ चेंडूत ६७ धावांची खेळी करून महाराष्ट्राविरुद्ध ३५५ धावांचे लक्ष्य पार करण्यास मदत केली. उजव्या हाताचा फलंदाज २०२० मध्ये भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. २०२२ मध्ये कुशाग्राने रणजी करंडक स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये नागालँडविरुद्ध द्विशतक झळकावले होते आणि भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले, तेव्हा तो फक्त १७ वर्षांचा होता, प्रथम श्रेणीच्या डावात २०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो सहावा-तरुण फलंदाज बनला.  

टॅग्स :आयपीएल लिलावदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२३