IPL Auction 2025 : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी देश-विदेशातील एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील फक्त ५७४ खेळाडूंना अंतिम यादीत स्थान देण्यात आले आहे. यात ३६६ भारतीय तर २०८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. अनेक स्टार क्रिकेटर्सची नावे फायनल यादीतून गायब झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातील एका स्टार खेळाडूची मेगा लिलावात 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
२ कोटीच्या क्बलमधून केली होती नाव नोंदणी
इंग्लंडचा जोफ्रा आर्चर याने २ कोटी या मूळ किंमतीसह आयपीएलसाठी नाव नोंदणी केली होती. पण मेगा लिलावाची जी अंतिम यादी जाहीर करण्यात आली त्यातून त्याचे नाव गायब झाल्याचे पाहायला मिळाले. अंतिम यादीत नाव नसेल तर हा खेळाडू लिलावातून बाद झाला असेच मानले जाते. पण जोफ्रा आर्चरच्या बाबातीत मात्र वेगळाच सीन क्रिएट झाला आहे. आतापर्यंत जे घडलं नाही ते या खेळाडूच्या बाबतीत होणार आहे. आयत्या वेळी त्याची मेगा लिलावात एन्ट्री होणार आहे.
तो मार्की प्लेयर्सच्या यादीत दिसणार?
'द क्रिकेटर'च्या वृत्तानुसार जोफ्रा आर्चर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी उपलब्ध असेल. त्याचे नाव अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआय आणि आयपीएलकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह या ठिकाणी होणाऱ्या लिलावात मार्की प्लेयरमध्ये तो दिसणार का? ते पाहण्याजदोगे असेल. जोफ्रा आर्चर याने इंग्लंड बोर्डाच्या सुचनेवरुन नाव नोंदणीनंतर माघार घेतली होती, असे बोलले जाते. या निर्णयामुळे आयपीएलच्या नव्या नियमानुसार त्याला दोन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागला असता. ते टाळण्यासाठी त्याने ही चाल खेळलेली असू शकते.
...तर अनेक फ्रँचायझी त्याच्यावर मोठा डाव लावण्यासाठी होतील तयार
बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार आयपीएलमध्ये नाव नोंदणी न करणाऱ्या परदेशी खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्ससह जोफ्रा आर्चरही या नियमाच्या कचाट्यात अडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. लिलावाची प्रक्रिया अगदी अखेरच्या टप्प्यात असताना त्याला खरंच लिलावात सहभागी होण्याची संधी मिळाली तर अनेक फ्रँचायझी त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रस दाखवतील, यात शंका नाही.