Rishabh Pant, LSG Sanjiv Goenka, IPL Auction 2025 Players List: जगातील सर्वात श्रीमंत अशा IPL स्पर्धेच्या आगामी हंगामासाठीच्या लिलावाला काल सुरुवात झाली. २४ आणि २५ नोव्हेंबरला जेद्दाह येथे तब्बल ५७७ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. त्यातील काल पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंना विविध संघांनी एकूण ४६७.९५ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे, नेहमी परदेशी खेळाडूंना मिळणाऱ्या मोठ्या रकमा यंदा भारतीय खेळाडूंना मिळाला. भारताचा रिषभ पंत २७ कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसेच, श्रेयस अय्यर (२६ कोटी ७५ लाख), वेंकटेश अय्यर (२३ कोटी ७५ लाख) यांनाही चांगला भाव मिळाला. लखनौ सुपरजायंट्स संघाने रिषभ पंतला IPL इतिहासातील सर्वाधिक २७ कोटींच्या बोलीसह संघात घेतले. या खरेदीनंतर LSG चे मालक संजीव गोयंका यांनी पंतच्या बोलीबाबत त्यांचे प्लॅनिंग सांगितले. पंतसाठी त्यांनी ठरवलेला प्लॅन आणि मूळ खरेदीची किंमत यातील फरकाबाबतही त्यांनी खुलेपणाने माहिती दिली.
काय म्हणाले संजीव गोयंका?
संजीव गोयंका म्हणाले, "रिषभ पंत हा संघाच्या योजनेचा एक भाग होता. आम्ही त्याला खरेदी करण्याची योजना आखली होती आणि त्याच्यासाठी २६ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम निश्चित केली होती. परंतु, २७ कोटी हा थोडा जास्तच पैसा खर्च झाला. रिषभ पंतचा समावेश होणे ही संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. पंत हा महान खेळाडू आहे. तो एक 'टीम मॅन' आणि मॅचविनर खेळाडू आहे. त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल."
पंत २ कोटींवरून २७ कोटींवर कसा पोहोचला?
लिलावात रिषभ पंतने त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली होती. लिलावात चढ्या भावाने त्याची विक्री होणे अपेक्षित होते. तो सर्व विक्रम मोडेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात होती आणि तसेच झाले. पंजाब किंग्ज, केकेआर, दिल्ली कॅपिटल्स या संघांनीही पंतला विकत घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. बोली लावण्याची प्रक्रिया २२ कोटी ५० लाख रुपयांना थांबली होती. त्यानंतर दिल्लीने RTM कार्ड वापरण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात लखनौ संघाने अंतिम बोली २७ कोटी रुपयांची असल्याचे सांगितले. त्यावर दिल्लीने माघार घेतली आणि अखेर रिषभ पंत दिल्लीतून लखनौ संघात पोहोचला.