आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आणि पॉवर प्लेमध्ये संघाला विकेट्स घेण्यात माहिर असलेल्या भुवनेश्वर कुमार यंदाच्या मेगा लिलावात उतरला होता. या स्टार गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या दोन फ्रँचायझी संघात तगडी फाईट झाल्याचे पाहायला मिळाले. पण या दोन्ही फ्रँचायझींना मागे टाकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने फायनल बाजी मारली.
२ कोटी प्राइज टॅगसह लिलावात नाव नोंदणी करणाऱ्या भुवीसाठी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर सुपर जाएंट्स यांच्यातील बिडीग वॉरमध्ये १०.५० कोटीची बोली लावत LSG नं MI ला आउट केले. भुवी लखनऊच्या ताफ्यात जाईल, असे वाटत असताना आरसीबीनं २५ लाख अधिक बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
मेगा लिलावाआधी साधला होता विक्रमी डाव
मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमार हा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडूंपैकी एक ठरला. यामागचं कारण हा गोलंदाज टीम इंडियाबाहेर असला तरी त्याची धमक अजूनही कायम असल्याचे त्याने मेगा लिलावाआधीच दाखवून दिले होते. २३ नोव्हेंबर २०२४ म्हणजे दोन दिवसांआधीच भुवीन T20 क्रिकेटमध्ये ३०० विकेट्सचा पल्ला गाठला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळताना त्याने दिल्लीच्या संघाविरुद्ध खास विक्रमाला गवसणी घातली होती.
भुवीची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. १७६ सामन्यात त्याच्या खात्यात १८१ विकेट्सची नोंद आहे. तो आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादशिवाय तो पुणे वॉरियर्स संघाकडूनही खेळताना दिसला होता.
दोन वेळा ठरलाय पर्पल कॅपचा मानकरी
भुवनेश्वर कुमार हा स्विंग गोलंदाजीसह डेथ ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी करण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. २०१६ आणि २०१७ या दोन्ही हंगामात सर्वाधिक विकेट्स सह तो दोन वेळा पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे.