- समीर नाईक
पणजी - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठीच्या खेळाडूंच्या लिलावासाठी ३३३ क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात गोव्याचा रणजी कप्तान दर्शन मिसाळ आणि अष्टपैलु क्रिकेटपटू मोहित रेडकर यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच गोव्याच्याच सुयश प्रभूदेसाई याला रॉयल चेलेंजर्स बेंगलोर संघाने रिटेन करत त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. तर गोव्याकडून रणजी खेळणारा अर्जुन तेंडूलकर याला मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केले आहे.
आयपीएलचा लिलाव दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता दुबईत होणार आहे. सहभागी १० संघांसाठी एकूण ७७ क्रिकेटपटूंसाठी 'स्लॉट' उपलब्ध असून यात ३० विदेशी आणि ४७ भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश असेल. दर्शन मिसाळ आणि मोहित रेडकर यांचा बेस प्राईस प्रत्येकी २० लाख असणार आहे.
२०१२ मध्ये रणजी पदार्पण केलेल्या ३१ वर्षीय दर्शन मिसाळने मागील दोन वर्षांपासून लक्षवेधक कामगिरी केली आहे. रणजीत ६४ सामन्यांत २८५० धावा आणि ११२ विकेट्सही काढल्या आहेत. गेल्या मोसमात दर्शनचा दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागात समावेश होता. गेल्या रणजी मोसमात दर्शनने २२ विकेट्स घेतल्या आणि चार अर्धशतकांनी एकूण ४३६ धावा केल्या होत्या.
२०२१-२२ हंगामात रणजी पदार्पण केलेल्या मोहित रेडकरने प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये ७ सामन्यात १९ विकेट्स काढल्या असून २३८ धावाही केल्या होत्या. यंदाच्या हंगामात सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धा, २३ वर्षाखालील एकदिवशीय क्रिकेट स्पर्धा व विजय हजारे एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेतही मोहितने गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.
यंदा २३ वर्षाखालील राज्य स्पर्धेत मोहितने ५ लीग सामन्यांत २० विकेट्स काढल्या आणि देशात अव्वल स्थान मिळविले. २३ वर्षीय मोहितने गेल्या मोसमात देवधर चषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागाचे प्रतिनिधीत्व करून एका सामन्यात ३ विकेट्स काढल्या होत्या. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात तो राखीव खेळाडूही म्हणून होता.
यापूर्वी स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती, सुयश प्रभूदेसाई हे गोमंतकीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंन्ग्स, व रॉलय चॅलेंजर्स बेंगलोर अनुक्रमे या संघाकडून खेळले आहेत.
Web Title: IPL Auction: Goa's Darshan Misal, Mohit Redkar to bid for IPL auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.