IPL 2022 Mega Auction मध्ये पहिल्या दिवसाच्या लिलावानंतर सर्वाधिक बुचकळ्यात पाडणाऱ्या Mumbai Indians ने दुसऱ्या दिवशी आपले पत्ते उघडले आणि चाहत्यांना सुखद धक्के दिले. पहिल्या दिवशी मुंबईच्या संघाने फक्त बेबी एबी डेवाल्ड ब्रेव्हीस, बासील थम्पी, मुरूगन अश्विन आणि महागडा इशान किशन या चौघांनी खरेदी केली होते. त्यामुळे २७ कोटींच्या रकमेत त्यांना तब्बल १७ खेळाडू विकत घ्यायचे होते. पण दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्सने आपला मास्टरप्लॅन सक्रीय केला आणि बाजी पलटवली. त्यामागे नक्की काय विचार होते, याचा खुलासा संघमालक Akash Ambani यांनी केला.
दुसऱ्या दिवशीच्या लिलावात मुंबईने शांतपणे सुरूवात करत पैसे वाचवून ठेवले. त्यानंतर महत्त्वाच्या खेळाडूंच्या वेळी मुंबईकडे सर्वात जास्त पैसे शिल्लक होते. त्याचा योग्य वापर करत मुंबईने जोफ्रा आर्चरवर ८ कोटींची मोठी बोली लावली. त्यानंतर हार्दिक पांड्यासाठी पर्याय म्हणून धिप्पाड टीम डेव्हिडलाही ८ कोटी २५ लाखांच्या बोलीवर संघात घेतलं. या व्यतिरिक्त अनेक उपयुक्त पण कमी लोकप्रिय असलेल्या खेळाडूंनाही संघात स्थान दिलं. या खरेदी प्रक्रियेबद्दल सोशल मीडियावर मुंबईचा उदो उदो सुरू होताच. त्यानंतर खुद्द मुंबई संघाचे मालक आकाश अंबानी यांनी संघाचा मास्टरप्लॅन सांगितला.
आकाश अंबानी काय म्हणाले?
"खेळाडू रिटेन करण्याची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वीच्या रात्री झोप लागली नव्हती. इशान किशनला आम्ही संघातून करारमुक्त केलं पण ऑक्शनमध्ये त्याला घेणार हे आधीच ठरवलं होतं. जोफ्रा आर्चरसाठीही आम्ही आधीच विचार करून ठेवला होता. या वेळी जरी तो खेळणार नसला, तरी जोफ्रा व जसप्रीत बुमराह ही जोडी पुढच्या IPL साठी सज्ज असेल. मला लिलावाआधी कोणी सांगितलं असतं की तुम्ही इशान किशन आणि जोफ्रा आर्चर दोघांना संघात विकत घेऊ शकाल तर मला विश्वास बसला नसता. पण महेला जयवर्धने यांनी नीट आखणी केली आणि संघात योग्य तो खेळाडू कसा येईल, यासाठी प्रयत्न केले. टीम डेव्हिडला खरेदी करणं चांगलंच ठरेल. तो पोलार्ड बरोबर सहा नंबरला फलंदाजी करणारा साथीदार असेल. कारण आम्ही कायम संघासाठी पॉवर हिटर निवडले आहेत", असं आकाश अंबानी यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने लिलावाआधी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केलं होते.
Web Title: IPL Auction Mega Auction Mumbai Indians Owner Akash Ambani reveals Masterplan after smart buys Jofra Archer Tim David
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.