मुंबई : आयपीएलच्या मेगा लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत जिंकलेला वेगवान गोलंदाज दिल्ली कॅपिटल्सला मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून ही बाब समोर आली.
ऐनवेळी ज्येष्ठ समालोचक चारु शर्मा यांनी सूत्रसंचालन करताना ह्युज एडमीड्स यांची कमतरता भासू दिली नाही. व्हिडिओनुसार वेगवान गोलंदाज खलील अहमद याच्यासाठी मुंबई व दिल्लीमध्ये चढाओढ रंगली. मुंबईने ५.२५ कोटी रुपयांची बोली लावली. दिल्लीचे सहमालक किरणकुमार ग्रांधी यांनी ५.५० कोटींच्या बोलीसाठी पॅडल उचलले व लगेच ‘सॉरी’ बोलत पॅडल खाली केले; मात्र ५.२५ कोटींची बोली मुंबईने लावल्याचे शर्मा यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी दिल्लीने ५.२५ ची बोली लावल्याचे म्हटले.
शर्मा यांनी मुंबईला ५.५० कोटींची बोली लावणार का, असेही विचारले; मुंबईने बोली न लावल्याने शर्मा यांनी दिल्लीने बोली जिंकल्याचे जाहीर केले व अहमद ‘दिल्लीकर’ झाला. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स फ्रेंचाइजींकडून एकानेही या निर्णयावर आक्षेप न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जे काही झाले त्याची मला काहीच कल्पना नाही. नेमका काय गोंधळ झाला याकडे मी लक्ष दिले नाही. मी माझे पूर्ण योगदान दिले. शिवाय ही प्रक्रिया सर्व संघांच्या समोर झाली. त्यामुळे जर कोणाला आक्षेप घ्यायचा असता, तर त्यांनी घेतला असता. पण असे काही झाले नाही. मी प्रत्येक खेळाडूचे नाव जाहीर केल्यानंतर बराच वेळ थांबलो. इतर कोणीही बोली लावू शकले असते. त्यामुळे नेमकं काय चुकलं हेच मला कळालेलं नाही आणि मी त्याला महत्त्वही देत नाही. - चारु शर्मा