नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला जेसन होल्डर आयपीएलच्या आगामी लिलावात चांगला भाव खावून जाईल अशी चिन्हे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने (आरसीबी) त्याच्यावर १२ कोटी रुपयांचा डाव टाकण्यासाठी कंबर कसली आहे. आरसीबीच्या लिलावातील डावपेचांची माहिती ठेवणाऱ्या सूत्रानुसार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना आधीच रिटेन करणाऱ्या आरसीबीने होल्डरला अष्टपैलू कौशल्यासाठी १२ कोटी मोजण्याचे ठरविले आहे. बेन स्टोक्स उपलब्ध नाही. हार्दिक पांड्या आणि मार्क्स स्टोयनिस यांना अन्य संघांनी करारबद्ध केले. मिशेल मार्श जखमांनी त्रस्त असल्याने आयपीएल खेळण्याची शक्यता कमीच आहे. अशावेळी होल्डरचा रेकॉर्ड पाहिल्यास तो शानदार खेळाडू आहे. आरसीबीसह अन्य संघदेखील होल्डरला स्वत:कडे ओढण्यास सज्ज असतील. आरसीसीबी लिलावात ५७ कोटींसह उतरेल. या संघाला तीन खेळाडूंमध्ये अधिक रुची दिसते. त्यात होल्डरव्यतिरिक्त चेन्नई सुपरकिंग्सचा माजी फलंदाज अंबाती रायडू आणि राजस्थानचा माजी युवा खेळाडू रियान पराग यांचा समावेश आहे.
नेतृत्वासाठी कोहलीची मनधरणी - आयपीएलच्या २०२० पर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या परागसाठी २०२१ चे पर्व मात्र फ्लॉप ठरले होते. तो मोठा हिटर असून ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो. लिलावात त्याच्यावरही मोठी बोली अपेक्षित आहे. कोहलीने नेतृत्व सोडल्यामुळे आरसीबी आता पुन्हा एकदा कर्णधार बनविण्यासाठी त्याची मनधरणी करेल, असे संकेत मिळत आहेत. अशावेळी श्रेयस अय्यरकडे नेतृत्व जाणार की पुन्हा एकदा कोहलीच कर्णधार म्हणून मैदानात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ब्रॅंडव्हॅल्यू महत्त्वाचा -लिलावात काय घडेल, याचा वेध घेणे कठीण असले तरी होल्डर आयपीएलमध्ये महागडा खेळाडू ठरेल, यात शंका नाही. अष्टपैलू खेळाडूंची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे. सूत्रानुसार ख्रिस मॉरिस चांगला खेळाडू होता. मात्र १६ कोटींच्या बोलीचा हकदार होता का? उत्तर आहे नाही. मात्र, अष्टपैलू खेळाडूंची उणीव असल्याने काही संघ उतावीळ झाले. युवराज सिंगसोबत असेच घडले. २०१५ ला दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला १५ कोटी रुपये दिले होते. त्यावेळी तो सर्वोच्च फॉर्ममध्ये नव्हताच. केवळ ब्रॅंडव्हॅल्युमुळे मोठी रक्कम देण्यात आली होती.
अंबाती रायुडूसाठी आठ कोटी -सूत्रानुसार होल्डरसाठी आरसीबीने १२ कोटी, तर अंबाती रायुडूसाठी आठ कोटी राखून ठेवले आहेत. परागला सात कोटी देण्याची आरसीबीची तयारी असेल. या तीनही खेळाडूंवर २७ कोटी खर्च झाल्यास त्यांच्याकडे २८ कोटी वाचतील. कोहली, मॅक्सवेल, सिराज, होल्डर, रायुडू आणि पराग हे कोअर खेळाडू असतील. तीनपैकी दोन पसंतीचे खेळाडू जरी संंघात आले तरी आरसीबीचा उद्देश सफल होणार आहे. सीएसकेच्या यशात रायुडूची भूमिका निर्णायक ठरली. महेंद्रसिंह धोनी फार संयमाने आणि काळजीपूर्वक खेळाडूंना संघात घेतो. गत विजेत्या संघाला रायुडू सोबतच हवा आहे. लिलावात रायुडू हा यष्टिरक्षक - फलंदाज म्हणून सहभागी होणार असेल तर अशावेळी फलंदाजी, यष्टिरक्षण आणि अनुभव या तीनही बाबींमुळे त्याला चांगला भाव मिळेलच, असे मानले जात आहे.