बंगळुरु : आयपीएलच्या १५व्या पर्वासाठी शनिवारी मेगा लिलाव होणार असून, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. अनेक खेळाडू यामध्ये मोठी रक्कम मिळण्यास सज्ज झाले असून, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, इशान किशन यांसारख्या धडाकेबाज खेळाडूंवर सर्वच दहा फ्रेंचाइजींची नजर असेल. दखल घेण्याची बाब म्हणजे यंदा सर्वाधिक खेळाडू दहा कोटींहून अधिक रक्कम मिळवतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांच्या समावेशानंतर दहा फ्रेंचाइजी मिळून येत्या दोन दिवसांमध्ये ५९० क्रिकेटपटूंसाठी बोली लावतील. यामध्ये २२७ विदेशी खेळाडूंचाही समावेश असेल. अनेक खेळाडू यंदा २० कोटींची विक्रमी किंमत मिळवतील, असे सांगितले जात आहे.
भारतीय खेळाडूंची ‘चांदी’
मेगा लिलावामध्ये प्रत्येक फ्रेंचाइजीला किमान १८ खेळाडू निवडणे गरजे आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू (आंतरराष्ट्रीय अनुभवी व अननुभवी) सहजपणे किंमत मिळवून जातील. त्यामुळेच गेल्यावर्षीचा पर्पल कॅप विजेता वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांची मूळ किंमत यंदा दोन कोटी रुपये इतकी आहे; परंतु त्याला याहून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठीही अनेक संघ पसंती दाखवतील. अंबाती रायुडूसारखे अनुभवी खेळाडू ७-८ कोटींची रक्कम मिळवतील. त्याचप्रमाणे, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांच्यावरही अनेक संघ बोली लावतील.
अय्यर ठरणार महागडा?
श्रेयस अय्यर या लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक महागडा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांनाही मोठी किंमत मिळू शकते. अनेक फ्रेंचाइजी या खेळाडूंसाठी बोली लावण्यास उत्सुक असल्याने तिघांच्या किमतीत कमालीची वाढ होईल. त्याचप्रमाणे, दीपक चहर आणि युजवेंद्र चहल यांच्यासाठीही मोठी चुरस रंगेल. प्रत्येक संघ मधली फळी मजबूत करण्यावर भर देत असून, लेग स्पिनर्स आणि विशेष करून अष्टपैलू खेळाडूंना संघात घेण्यावर अधिक भर देतील.
वॉर्नर, होल्डरवर अधिक लक्ष
विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर किंमत घेऊन जातील. २०१६ साली सनरायझर्स हैदराबादला विजेतेपद मिळवून देणाऱ्या वॉर्नरसाठी सर्वच संघ उत्सुक आहेत, अपवाद केवळ हैदराबादचा. गेल्या दोन सत्रांपासून हैदराबाद संघ व्यवस्थापन व वॉर्नर यांच्यातील संबंध बिघडल्याने हैदराबाद त्याच्यासाठी बोली लावणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जेसन होल्डर सध्या जबरदस्त लयीमध्ये असून त्याच्यासाठी सर्वच फ्रेंचाईजी मोठी किंमत लावतील. कदाचित तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडूही ठरू शकेल. ड्वेन ब्रावो, ओडियन स्मिथ, रोमारिओ शेफर्ड, कागिसो रबाडा आणि यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डीकॉक यांच्यासाठीही मोठी चढाओढ रंगेल.
अर्जुनचेही आकर्षण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याचे लिलाव प्रक्रियेत आकर्षण ठरेल. गेल्यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले होते. अर्जुन अद्याप एकही आयपीएल सामना खेळलेला नाही. मात्र, त्याने मुंबईच्या वरिष्ठ संघातून आपली छाप पाडली असून विविध वयोगटातील स्पर्धांमध्येही प्रभावी अष्टपैलू खेळ केला नाही. यंदाही त्याची मूळ किंमत २० लाख रुपये आहे.