नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रॅन्चायसींना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आयपीएलच्या भविष्याचा निर्णय अपेक्षित आहे. स्पर्धा पूर्ण होईल की सामन्यांची संख्या कमी केली जाईल, स्पर्धेचे आयोजन भारतात की विदेशात, या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. स्पर्धेचे आयोजन झाले तर टीव्ही प्रेक्षकांची संख्या वाढेल, अशीही या फ्रॅन्चायसींना आशा आहे.
ऑक्टोबरमध्ये १६ संघांच्या आदरातिथ्यावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषक आयोजित करणे शक्य नसल्याची कबुली दिली. अशावेळी कोरोनाचा सामना करताना आयपीएल आयोजनास बळ मिळताना दिसते.
किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया म्हणाले, ‘सद्यस्थिती पाहता १६ संघांच्या सहभागासह विश्वचषकाचे आयोजन होणे गुंतागुंतीचे असेल. आयपीएलचे आयोजनदेखील सोपे नाही. आयोजनासाठी मैदानाच्या आत आणि बाहेर पायाभूत सुविधा असतील असेच ठिकाण हवे आहे.’ कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर यांनी मागच्या आठवड्यात लीगच्या वेळापत्रकात कुठलीही कपात न करता पूर्ण स्पर्धा आयोजनाची मागणी केली. आयपीएलचे अन्य हितधारक त्यांच्या या मागणीशी सहमत नाहीत. कोरोनामुळे सामन्यांच्या संख्येत कपात शक्य आहे.
वाडिया पुढे म्हणाले, ‘आयपीएलच्या पूर्ण आयोजनासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरू असल्याची मला खात्री आहे. मात्र सामन्यांची संख्या कमी झाली तरी काही हरकत नाही. कोरोनातही आयपीएल व्हायला हवे, इतकीच मागणी आहे. २००९ ला आम्ही महिनाभराच्या कालावधीत भारताऐवजी द. आफ्रिकेत आयपीएल आयोजन केले होते.’ अन्य एका संघाच्या अधिकाऱ्याने स्वत:चे नाव न सांगण्याच्या अटीवर आम्ही कमी सामन्यांचे आयपीएल पसंत करणार नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने आयपीएल आयोजनासाठी विदेशाचा विचार पुढे आला आहे. यूएई आणि श्रीलंका बोर्डाने आयोजनाची तयारीदेखील दाखवली. कोरोनाचा सर्वांत कमी प्रभाव न्यूझीलंडमध्ये असल्याने आयोजनासाठी हादेखील एक पर्याय असू शकतो मात्र दोन्ही देशांच्या वेळा आयोजनाच्या विरोधात जातात. अशावेळी आयोजन स्थळ आणि सामन्यांची संख्या याबाबत हितधारकांना विश्वासात घेऊन तोडगा निघू शकतो, असे वाडिया यांचे मत आहे.
Web Title: IPL audience is expected to grow
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.