मुंबई : जगभरात सुरूअसलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे क्रीडाविश्वालाही मोठा फटका बसला आहे. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटविश्व सुरू होताच पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती आयपीएलची. यंदा आयपीएल होणार की नाही, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाची नजर असताना दुबईमध्ये यंदा आयपीएल खेळविण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय संघाचे शिबिर दुबईमध्ये आयोजित करण्याच्या हालचालींना वेग दिल्याने चाहत्यांचे लक्ष दुबईकडे लागले आहे.या घडामोडींमध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याने आयपीएल आयोजनातील अडथळा दूर होताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र याच दरम्यान बीसीसीआयचा आयपीएल आयोजनाचा विचार असल्याने ईसीबीने भारत दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.जर यंदा आयपीएल रद्द करण्याचा निर्णय झाला तर बीसीसीआयला तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल. यासाठी बीसीसीआय आयपीएल खेळविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जगभरात अजूनही कोरोनाचा कहर कमी झालेला नसताना, बीसीसीआयने यूएईमध्ये आयपीएल आयोजनाचे संकेत दिले आहेत. यासाठीच बीसीसीआयने आपल्या केंद्रीय करारबद्ध राष्ट्रीय खेळाडूंचे सराव शिबिर दुबईमध्ये आयोजित करण्याचा विचार केला आहे.याआधी बीसीसीआयची स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुंबईला पहिली पसंती होती. मात्र येथील कोरोना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने आता दुबईचा विचार होत आहे. बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्राने माहिती देताना सांगितले की, ‘आम्हाला पूर्ण आशा आहे की, यंदा आयपीएल यूएईमध्ये आयोजित करण्यात येऊ शकते.’ अमिरात क्रिकेट संघटनेने यंदा आयपीएल आपल्या भूमीवर आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला प्रस्ताव दिला होता. याबाबतचे वृत्त जूनमध्ये वृत्तसंस्थेने दिले होते.आयसीसीचा निर्णय ठरणार निर्णायक!सध्या बीसीसीआयचे सर्व लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णयावर आहे. कारण आयसीसी काही दिवसांमध्ये आॅस्ट्रेलियामध्ये होणाºया टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेणार आहे. कोरोनाचे संकट असताना विश्वचषक खेळवायचा की नाही, याचा विचार आयसीसी करत असून अद्याप याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. विश्वचषक रद्द झाल्यावरच आयपीएल खेळवणे शक्य आहे. मात्र विश्वचषक खेळविण्याचा निर्णय आयसीसीने घेतला तर बीसीसीआयपुढे मोठी समस्या उभी राहू शकते. त्यासाठीच आता आयसीसी नेमकी काय भूमिका घेते, यावर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे.इंग्लंडने केला दौरा स्थगित!यंदा सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघ भारत दौºयावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार होता. बीसीसीआय याचदरम्यान आयपीएल खेळविण्याचा प्रयत्न करत असल्याने होणारी अडचण टाळण्यासाठी इंग्लंडने थेट भारत दौराच स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली. अद्याप बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. मात्र बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘नक्कीच सद्यपरिस्थितीमध्ये इंग्लंड संघ भारत दौºयावर येऊ शकणार नाही.’ शुक्रवारी बीसीसीआयची बैठक होणार असून यामध्ये भारताच्या भविष्यातील कार्यक्रमावर (एफटीपी) चर्चा होईल. या बैठकीनंतर औपचारिक घोषणा होण्याची शक्यता असल्याचे, अधिकाºयाने सांगितले.प्राधान्य भारतालाच..!बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल आयोजनासाठी प्रथम प्राधान्य भारतालाच असेल असे याआधीच सांगितले आहे. ‘यंदा आयपीएल खेळविण्याची आमची खूप इच्छा आहे, क्रिकेट पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले पाहिजे. पण यासाठी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत आयसीसीची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे. सध्या प्रसारमाध्यमांतून वेगवेगळे वृत्त मिळत आहे, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण आम्हाला आयपीएल आयोजित करायचे आहे. आम्हाला ३५-४० दिवसाचा अवधी मिळाला, तरी आयपीएल खेळवू,’ असे संकेत गांगुली यांनी दिले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आयपीएल होणार दुबईत, बीसीसीआयचे संकेत; राष्ट्रीय सराव शिबिर यूएईमध्ये आयोजनाच्या हालचालींना वेग
आयपीएल होणार दुबईत, बीसीसीआयचे संकेत; राष्ट्रीय सराव शिबिर यूएईमध्ये आयोजनाच्या हालचालींना वेग
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय संघाचे शिबिर दुबईमध्ये आयोजित करण्याच्या हालचालींना वेग दिल्याने चाहत्यांचे लक्ष दुबईकडे लागले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:41 AM