नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी बीसीसीआयने सर्व महत्त्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. सध्या खेळाडूदेखील लॉकडाऊनमध्ये घरी अडकले आहेत. आयपीएलचे तेरावे सत्र बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केले. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटी रुपयांचा फटका बसेल. हे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचे आयोजन करता येईल का, याची चाचपणी करीत आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचे १३ वे सत्र आयोजित करू शकते.‘सध्या यावर ठामपणे बोलता येणार नाही, अनेक गोष्टी जुळून येणे गरजेचे आहे. पण होय, बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन करता येईल का, याची चाचपणी करत आहे. पण अर्थात यासाठी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे आणि सरकारची परवानगी मिळणे गरजेचे आहे. पण सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ आयपीएल आयोजनासाठी अनुकूल आहे,’ असे बीसीसीआयमधील सूत्रांनी बुधवारी सांगितले. सरकारने या काळात स्पर्धेला मान्यता दिल्यास, मैदाने, खेळाडूंचा प्रवास या सर्व गोष्टींचे नियोजन कसे करायचे याची तयारीदेखील बीसीसीआयने सुरू केली आहे. मात्र या सर्व गोष्टींसाठी देशातील परिस्थिती सुधारण्यावर विसंबून असतील. रविवारी केंद्र सरकारने देशातील क्रीडा स्टेडियम आणि मैदाने उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र या परिसरात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी नाही. त्यामुळे आयपीएल आयोजनाबद्दल सरकार नेमके काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (वृत्तसंस्था)आॅगस्टपासून तयारीला येईल वेगयासंदर्भात एका फ्रेन्चायसी अधिकाऱ्यासोबत संपर्क साधला तेव्हा त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. बीसीसीआयचे प्लॅनिंग सुरू असल्याचे सांगून हे अधिकारी म्हणाले, ‘लीग सुरू करायची झाल्यास एक महिन्याचे प्लॅंिनंग हवे. विदेशी खेळाडू येणार असतील तर कोरोनासाठी सरकार जी नियमावली तयार करील त्या नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे. सप्टेेंबरअखेर लीग सुरू होईल तेव्हा आॅगस्टपासून सर्व तयारीला वेग यायला हवा.आयपीएल आयोजनासाठी आॅस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक रद्द व्हायला हवा. विश्वचषकाचे आयोजन १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ठरले आहे. आॅस्ट्रेलिया संघातील काही खेळाडूंनी मात्र पूर्वनिर्धारित कालावधीत विश्वचषकाचे आयोजन होण्याची शक्यता नसल्याचे वारंवार सांगितले आहे.