Join us  

आयपीएल सट्टा; आज अरबाज खानची चौकशी

‘आयपीएल’ क्रिकेटवरील सट्टा प्रकरणात आता बॉलीवूड अभिनेता अरबाज खान याचीही चौकशी केली जाणार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:36 AM

Open in App

ठाणे : ‘आयपीएल’ क्रिकेटवरील सट्टा प्रकरणात आता बॉलीवूड अभिनेता अरबाज खान याचीही चौकशी केली जाणार आहे. अटकेत असलेला बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजला शनिवारी हजर होण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली.जलालकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी जलालने अरबाजकडे तगादा लावला होता. त्यासाठी वारंवार त्यांचे फोनवरून आणि मध्यस्थांमार्फत बोलणेही झाले. पण अरबाज त्याला प्रतिसाद देत नव्हता. याचप्रकरणी जलालने त्याला धमक्याही दिल्या होत्या. सोशल मीडियावर अरबाज] जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते. जलालच्या मोबाइलमध्येही काही बुकी तसेच अरबाजचे फोटो जलालसोबत आहेत. याच माहितीच्या आधारे ठाण्याचे खंडणीविरोधी पथक अरबाजची चौकशी करतील. त्याने किती पैशांचा सट्टा लावला? त्यातील किती पैसे देणे बाकी आहेत? आदीची चौकशी करण्यासाठीच त्याला २ जून रोजी खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले.देशभरातील ९८ सट्टेबाज जलालच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या चौकशीत उघड झाली होती. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैदराबाद सुपरकिंग्ज असा शेवटचा सामना होता. याच सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील ९८ बुकी जलालच्या संपर्कात होते. ही माहिती त्याच्याच साथीदारांकडून मिळाल्यावर पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.

टॅग्स :अरबाज खान