नवी दिल्ली : ‘आमचे खेळाडू राष्ट्रीय संघाऐवजी आयपीएलला अधिक प्राधान्य देतात, असा टोला मारुन सध्याच्या टी-२० विश्वचषकात झालेल्या चुका सुधारण्यासाठी उत्कृष्ट कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी बीसीसीआयने स्वीकारायला हवी,’ असे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले आहे.
भारताला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्यानंतर एबीपी न्यूजशी बोलताना कपिल म्हणाले, ‘आमचे खेळाडू देशासाठी खेळण्याऐवजी आयपीएलला प्राधान्य देणार असतील तर काय म्हणावे? खेळाडूंना देशासाठी खेळताना गर्व वाटायला हवा. मला त्यांच्या आर्थिक सुबत्तेची माहिती नसल्यामुळे भाष्य करणे योग्य नाही.’ आयपीएलचे आयोजन विश्वचषकाच्या तोंडावर करण्यात आले होते. कोरोनामुळे बीसीसीआयने हे व्यस्त वेळापत्रक राबविले. कपिल यांच्या मते, ‘आधी राष्ट्रीय संघ आणि नंतर फ्रॅन्चायजीचा क्रम असायला हवा. आयपीएल खेळू नका, असे मी म्हणणार नाही. पण उत्कृष्ट कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे.’
स्पर्धेत ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी बाळगणे, हीच आमच्यासाठी मोठी सुधारणा असेल. आयपीएलचा दुसरा टप्पा आणि टी-२० विश्वषचक यात काही काळाचे अंतर असायला हवे होते. मात्र, आता भविष्यातील योजनांवर अंमल करण्याची गरज आहे. २०१२नंतर प्रथमच उपांत्य फेरीपासून दूर राहिल्याचे अपयश प्रत्येकाने स्वीकारावे. दिग्गजांनी कारकीर्दीत चांगली कामगिरी केली. पण, तुम्ही खराब कामगिरी करीत असाल तर टीका सहन करण्याचीदेखील तयारी ठेवायला हवी. द्विपक्षीय मालिकेत आमच्या खेळाडूंचा रेकॉर्ड चांगलाच आहे. त्याचवेळी आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरत असाल तर चाहते तुम्हाला माफ करणार नाहीत, असेही कपिल यांनी म्हटले आहे.
Web Title: IPL bigger than country for our players- Former Indian Cricketer Kapil Dev
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.